धाराशिव ता. 11: महायुतीच्या राज्य सरकारमध्ये सहभागी मंत्र्यांना ‘कलंकित’ आणि मुख्यमंत्र्यांना ‘हतबल’ संबोधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी ( ता.11) दुपारी बारा वाजता साडेबारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक अनोखे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी,माजी आमदार दयानंद गायकवाड, जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले.
विविध मंत्र्यांच्या भ्रष्ट व बेजाबाबदार कारभारावर प्रतिकात्मक टीका करण्यासाठी कार्यकर्त्यांनी हटके पद्धतींचा वापर केला.
आंदोलनादरम्यान, माजी कृषिमंत्री व आताचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. आंदोलनस्थळी पत्याचा डाव सुरु केला, तर पैसे व ड्रग्ज चेही प्रतिकात्मक वाटप यावेळी केले. मंत्री भरत गोगावले यांना ‘जादूटोणा करणारे मंत्री’ असे संबोधून त्यांच्या नावाने अघोरी पूजा मांडण्यात आली. ओम भट स्वाहा चा नारा देत सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर, ड्रग्ज माफियांकडून सत्कार स्वीकारल्याचा आरोप असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध करण्यासाठी ‘ड्रग्ज’ लिहिलेल्या पुड्या फेकण्यात आल्या.आंदोलकांनी हातात सरकारविरोधी घोषणा लिहिलेले फलक घेतले होते. “कलंकित मंत्री, हतबल मुख्यमंत्री” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.












