धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी साताऱ्यातील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ४५० कीट वाटप
धाराशिव, ता. ३० : (प्रतिनिधी):मागील दहा-पंधरा दिवसांपासून मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. ढगफुटी सदृश पावसामुळे भूम, परंडा आणि वाशी तालुक्यांमधील अनेक गावे जलमय झाली असून शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, शेतातील माती खरडून गेली, तर नागरिकांचे घरगुती साहित्य, कपडे, भांडी, अंथरूण-पांघरूण देखील पाण्यात वाहून गेले आहे. प्रशासनाने काही भागातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केले असले तरी अनेक ठिकाणी अद्याप मदत पोहोचलेली नाही. अनेक घरांमध्ये सध्या फक्त चिखलच उरला असून नागरिकांकडे जीवनावश्यक वस्तूंचा गंभीर तुटवडा आहे.
या बिकट परिस्थितीत दानशूर संस्था आणि सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. साताऱ्यातील जमीयत ए उलेमा ए हिंद, खिदमत ए खल्क सामाजिक संस्था आणि ‘मी मुस्लीम मावळा छत्रपतींचा’ सामाजिक संस्था यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या ४५० कीटचे वाटप केले.
परंडा तालुक्यातील करंजा, आवार पिंपरी, लोहारा, व्हागेगव्हाण, वडनेर आणि खासापुरी या गावांमध्ये ही मदत पोहोचविण्यात आली. या किटमध्ये अन्नधान्य, वापराचे साहित्य आणि घरगुती गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. विशेष म्हणजे, शेतकरी, कष्टकरी आणि मजुरीवर जगणाऱ्या सामान्य नागरिकांना या मदतीचा मोठा आधार मिळाला आहे.
या मदत कार्यात जमीयत उलमा ए हिंद साताराचे सेक्रेटरी मुफ्ती उबेदुल्हा, मुफ्ती मोहसिन, हाजी मोहसिन बागवान, ‘मी मुस्लीम मावळा छत्रपतींचा’ संस्थेचे सैफुल्ला ग्रुपचे मोबीन म्हाढवाले, इम्तियाज बागवाण, आझर मनियार, ईस्माईल पठाण, युसुफ शेख, शाहरूख शेख, मजहर खराडी, साकीब शेख, सारीम शेख, शोयब मुजावर, ईरफान शेख, समीर पठाण, हाजी मुर्तुजा पठाण आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच खिदमत ए खल्क संस्था साताराकडून सादीक शेख, आरीफ खान, मोहसिन कोरबु, मुज्जफर सय्यद, आसीफ खान, हाजी नदाफ, मुशरत शेख, सिद्धिक शेख, आसीफ फरास, अझहर शेख, जमील शेख यांच्यासह जमीयत उलमा ए हिंद – परंडाचे सर्व पदाधिकारीही या मदतकार्याच्या अग्रभागी उभे राहिले. त्यांच्या माध्यमातून गावोगावी प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावलेल्या नागरिकांच्या डोळ्यांत या मदतीमुळे दिलासा दिसून आला. सध्या ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर मदतीची आवश्यकता असून, राज्यातील इतर दानशूर व्यक्तींनी आणि संस्थांनीही धाराशिवसह मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन या संघटनांनी केले आहे.
राज्य शासनाकडून मदत मिळेल तेव्हा मिळेल; मात्र तत्काळ गरज भागविण्यासाठी सामाजिक संघटनांचा हात पुढे आल्याने पुरग्रस्तांना दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
















