धाराशिव नगरपरिषदेत ६१.१४ टक्के मतदान; निकाल २१ डिसेंबरला – उमेदवारांची धाकधूक शिगेला
धाराशिव दि.— धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची मतदान प्रक्रिया दिनांक २ नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडली. एकूण १०८ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ६१.१४ टक्के मतदान झाले. आता सर्वांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले असून निकालाची उत्कंठा सर्वत्र पसरली आहे.
धाराशिव नगरपरिषदेत एक नगराध्यक्ष व ४१ नगरसेवक अशा एकूण ४२ जागांसाठी ही निवडणूक झाली. शहरातील प्रभागांची संख्या २० असून एकूण ९४,००६ मतदारांपैकी ५७,४७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदार ४८,४०७, महिला मतदार ४५,५८३ तर इतर मतदार १६ इतके होते.
अध्यक्ष पदासाठी यंदा मोठी लढत पाहायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून नेहा काकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संगीता सोमनाथ गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून परविन खलील कुरेशी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अॅड. मंजुषा साखरे मैदानात होत्या. एकूण सहा उमेदवार या पदासाठी मतांची लढत देत होते.
नगरसेवक पदांसाठी तब्बल २०१ उमेदवार रिंगणात उतरल्यानं स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली. प्रत्येक प्रभागात चुरशीची टक्कर पाहायला मिळाली असून सर्व पक्षांनी आपापले बालेकिल्ले भक्कम करण्यासाठी जोरदार प्रयास केले.
मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर रोजी होणार असून कोणता पक्ष नगरपरिषदेत बाजी मारणार, कोण नगराध्यक्षपदाची सरशी करणार व कोण पराभूत ठरणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारांनी आपल्या ‘गेम-गोळा- बेरीज’ला प्रारंभ केल्याने राजकीय वातावरण तापले असून निकालानंतर नगरपरिषदेत नव्या समीकरणांना सुरुवात होणार हे निश्चित आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












