धाराशिव बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम… उद्घाटन होऊन चार महिने उलटले तरी प्रवासी-कर्मचाऱ्यांचे हाल कायम
निकृष्ट बांधकामाने नूतन बसस्थानक झाले भुताटकी!”
कामगार दिनी उद्घाटन, पण कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शौचालयात जावे लागते!
धाराशिव दि.१६(अमजद सय्यद):धाराशिव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन एक मे (कामगार दिन) रोजी राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात झाले. मात्र उद्घाटनानंतर तब्बल चार महिने उलटून गेले तरीही बसस्थानकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. प्रवाशांचे तर सोडाच, कर्मचाऱ्यांचेच हाल संपेनात अशी अवस्था निर्माण झाली आहे.
उद्घाटनावेळी बसस्थानकाचे बहुतांश काम अपूर्ण होते. पत्रकारांनी पालकमंत्री सरनाईक यांना “निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी होणार का?” असा सवाल केल्यावर त्यांनी चौकशी समिती नेमल्याचे सांगितले होते. तसेच, “अशा दर्जाहीन कामाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले, याची मला खंत वाटते. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करणार,” अशी ग्वाही दिली होती. मात्र आजपर्यंत चौकशी अहवालाचा काहीच मागोवा नाही.
बसस्थानकाची दयनीय परिस्थिती
नवीन बसस्थानकाचे अर्थकारण व कॅशियर विभाग हे पाठीमागील एका जीर्ण व पडीक असलेल्या इमारतीतून घरातून चालवले जात आहे. या ठिकाणी झाडे-झुडपे, गवत, दुर्गंधी, डुकरे, कुत्री, जनावरे व साप यांचा वावर असून कर्मचाऱ्यांना रोजच्या रोज यातूनच काम करावे लागत आहे. पावसाळ्यात गटाराचे पाणी वाहत असल्याने महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना रात्री बेरात्री पाय पाण्यात घालून तिकीट मशिन व रोख रक्कम जमा करावी लागते. मात्र नवीन बसस्थानकामध्ये एवढी जागा असताना येथील कामकाज तिकडे स्थलांतरित करण्यासाठी कोणाचा बालहट्ट आहे याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.!
कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांचा बोजवारा
मागील आठवड्यातच सुरू झालेले दुसऱ्या मजल्यावरील विश्रामगृह आठ दिवसातच पडीक घरासारखे झाले आहे. छत गळते, शौचालये चोकअप आहेत, आंघोळीला पाण्याची कोणतीही सोय नाही. परिणामी, संभाजीनगर, पुणे, कराड, सातारा आदी ठिकाणांहून आलेले कर्मचारी सार्वजनिक शौचालयात पैसे भरून अंघोळ व स्नान करत आहेत. “अशा अवस्थेत नवीन विश्रामगृहाचा काहीही उपयोग नाही,” अशी कर्मचाऱ्यांची व्यथा आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
बस डेपो मॅनेजर व एटीएस अधिकारी या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे. स्थानिक प्रशासन झोपेत गेले आहे का, असा प्रश्न प्रवासी व कर्मचारी उपस्थित करतात. उद्घाटनाच्या दिवशी संपूर्ण यंत्रणा सज्ज व्हायला हवी होती, मात्र आज चार महिने उलटले तरी परिस्थिती जसंच्या तशी आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल“बसस्थानकाचे काम कधी पूर्ण होणार?”“निकृष्ट दर्जाच्या बांधकामात दोषींवर काय कारवाई होणार?”“चौकशी समितीचा अहवाल केव्हा येणार?”असे प्रश्न नागरिक वारंवार विचारत आहेत. परंतु पालकमंत्री यावर वारंवार मौन बाळगत आहेत.
दौऱ्यात पाहणी करणार का?
सध्या पालकमंत्री सरनाईक दोन दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचाऱ्यांच्या व प्रवाशांच्या व्यथा ऐकाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, “परिवहन मंत्री म्हणून नव्हे तर केवळ पर्यटन मंत्री म्हणूनच त्यांची ओळख राहील,” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वतःला जिल्ह्याचे नेतृत्व समजणारे स्थानिक लोकप्रतिनिधी उद्घाटनावेळी फोटोसेशन करून निघून गेले. मात्र आज बसस्थानकाची अशी बिकट अवस्था असूनही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याबाबत त्यांची जबाबदारी येत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786


















