धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतशिवार, गावं, वस्त्या आणि घरांमध्ये पाणी शिरलं. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांच्या आयुष्याला जणू काही पाण्याचा विळखा पडला. अशा वेळी माणसाला माणसाचं खांद्यासोबत खांदा लावणं गरजेचं असतं. नेहमी टीका-टिप्पणीच्या भोवऱ्यात असणारे लोकप्रतिनिधी मात्र या वेळी स्वतः पाण्यात उतरले. गुडघाभर पाणी, चिखल आणि असुविधा असूनही त्यांनी नागरिकांना आधार दिला.
खा. ओमराजे निंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, माजी आरोग्यमंत्री आ. तानाजी सावंत आणि आ. प्रवीण स्वामी हे नेते संकटाच्या या काळात खरोखरच लोकांमध्ये मिसळले. फोनवरून चौकशी करण्याऐवजी, बैठकीतून आदेश देण्याऐवजी त्यांनी गावोगाव जाऊन प्रत्यक्ष मदतीचे हात पुढे केले. कुठं अडकलेल्या कुटुंबांना बाहेर काढलं, कुठं घरात अडकलेल्या वृद्धांचा धीर वाढवला, तर कुठं शेतकऱ्यांचे गाळात गेलेले जनावरं सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.
या सगळ्या गोंधळाच्या आणि भीतीच्या वातावरणात त्यांच्या उपस्थितीने जनतेला मानसिक आधार मिळाला. “आपण एकटे नाही, आमचे लोकप्रतिनिधी सोबत आहेत” हा भाव मनात निर्माण झाला. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले या सगळ्यांशी संवाद साधताना नेत्यांनी केवळ राजकीय प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर एक आपुलकीचा नातं जपणारं कुटुंबातील व्यक्ती म्हणून सहभाग घेतला.
पाण्यात ओले कपडे, अंगावर चिखल, थकवा असूनही ते वारंवार सांगत होते – “तुमचं दुःख आम्ही समजतो, सरकारकडून आणि प्रशासनाकडून योग्य मदत मिळवून देऊ.” ही केवळ आश्वासनं नव्हती, तर संकटात माणसाला दिलासा देणारी शब्दफुले होती.
आज धाराशिवकरांना गरज आहे ती केवळ आर्थिक मदतीची नाही, तर मानसिक धीराचीसुद्धा. कारण पिकं गमावणं, घरातलं सामान वाहून जाणं, जनावरं मृत्युमुखी पडणं – या सगळ्या गोष्टी आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत. त्यावर एकमेव उपाय म्हणजे एकमेकांना आधार देणं. आणि हेच काम सध्या लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे करताना दिसत आहेत.
संकट काळ नेहमीच शिकवून जातो की माणूसपण हेच खरं नातं आहे. मतं, पक्ष, विचारधारा यापलीकडे जाऊन जेव्हा नेता-कार्यकर्ते लोकांमध्ये येतात, तेव्हा त्यांची खरी ओळख घडते. आज धाराशिवच्या जनतेनं त्यांच्या प्रतिनिधींच्या या कार्याला “राजकारणापलीकडची माणुसकी” म्हणून ओळख दिली आहे.
उद्याचे राजकीय समीकरण काहीही असोत, पण आज पाण्यात उतरून मदत करणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करून गेलेत. संकटाच्या या लढाईत नागरिक आणि त्यांचे प्रतिनिधी खऱ्या अर्थानं एकत्र उभे आहेत, हीच खरी ताकद आहे जिल्ह्याची.
– प्रमोद राऊत, धाराशिव
अतिथी संपादक,
मो.नं. 9373438352
















