धाराशिव शहरातील अवैध जाहिराती, फलक व होर्डिंग तात्काळ हटवा – अन्यथा… जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नगरपालिका ॲक्शन मोडमध्ये.!
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी):धाराशिव शहरातील प्रमुख चौक-चौकांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग व पोस्टर्स लावून शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे. या अवैध होर्डिंगमुळे प्रवाशांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ते तात्काळ हटविण्याची मागणी युवा शिवसेना (ठाकरे गट) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात “तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.
युवा सेना शहराध्यक्ष अभिराम कदम, माजी नगरसेवक राणा बनसोडे व प्रवीण केसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिव नगरपालिकेला पत्र पाठवून शहरातील सर्व अनधिकृत जाहिराती व होर्डिंग तात्काळ हटविण्याचे आदेश दिले. परिणामी नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, शहरात लावलेले सर्व बॅनर, पोस्टर्स व होर्डिंग काढून घेण्याचे आदेश संबंधित होर्डिंगधारकांना देण्यात आले आहेत. अन्यथा नगरपालिका मुख्याधिकारी व वरिष्ठ अधिकारी (आदेशाने) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः ते हटवून जप्त करणार असल्याचा इशारा स्वच्छता विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी सांगितले की, “शहरातील रस्त्यांवर, चौकांत तसेच खांबांवर परवानगीशिवाय लावलेले सर्व बॅनर-होर्डिंग जप्त करण्यात येतील. कायमस्वरूपी उभारलेली अनधिकृत स्ट्रक्चर्स देखील हटवली जातील. यापुढे केवळ नगरपालिकेची पूर्वपरवानगी घेतल्यासच आणि ठरवून दिलेल्या जागांवरच जाहिरात फलक व होर्डिंग लावण्याची परवानगी असेल. तसेच प्रत्येक बॅनरवर क्यूआर कोड लावणे बंधनकारक असेल. तीन ते सात दिवसांची मुदतच जाहिरातीसाठी दिली जाणार असून, त्यानंतरचे सर्व फलक अवैध मानले जातील.”
दरम्यान, अवैध होर्डिंगमुळे शहराचे सौंदर्य हरवत असून अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने प्रतिष्ठित नागरिकांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर प्रशासनाकडून सुरू झालेली कारवाई पाहता, शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग व बॅनर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये हटवले जाण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
“अनधिकृत जाहिरातींमुळे शहर कुरूप दिसतेच पण जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाने सातत्याने कारवाई करत हा प्रकार आळा घालावा,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












