उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून दिला धीर… आनंद (तात्या) पाटील यांची शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी व मदतीची मागणी
धाराशिव दि.२४(प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे करंजा गाव तसेच शिंदे व करळे वस्तीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला असून, करंजा परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये माती व चिखल साचल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली व “सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे” असा धीर दिला.
या पाहणी दौऱ्यासोबत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजीराव सावंत, आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर, तसेच शिवसेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद (तात्या) पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आनंद (तात्या) पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे केवळ पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण जगणे उद्ध्वस्त झाले असल्याचे नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, “अशा भीषण संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन तत्काळ आर्थिक मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत असून, सरकारकडे तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री शिंदे व नेत्यांसमोर आपले प्रश्न मांडले असता, त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
परांडा तालुक्यातील या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, आनंद (तात्या) पाटील यांच्या मागणीमुळे शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत अधिक जोरकसपणे पोहोचला आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













