पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या संकल्पनेतून तुळजाभवानी नवरात्रोत्सवासाठी एआय पथक कार्यान्वित — सीसीटीव्हीच्या मदतीने गुन्हेगार व मिसिंग शोध मोहिमेला गती
तुळजापूर दि.२५(अमजद सय्यद):धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक, श्रीमती रितू खोखर यांच्या संकल्पनेतून यावर्षीच्या श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच एआय पथक (गुन्हेगार शोध व मिसिंग शोध पथक) कार्यान्वित करण्यात आले आहे.
या अभिनव उपक्रमाअंतर्गत अत्याधुनिक Artificial Intelligence (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिसिंग व्यक्ती तसेच गुन्हेगारांचा शोध घेण्यात येणार आहे. या पथकाद्वारे मिळणाऱ्या तात्काळ माहितीद्वारे पोलिसांना जलद कारवाई करता येणार असून नवरात्र महोत्सवात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम मोठा मैलाचा दगड ठरणार आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, निवासस्थान क्षेत्रे तसेच गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून काटेकोरपणे देखरेख ठेवण्यात येणार आहे. एआय पथक हे केवळ गुन्हेगार शोधण्यापुरते मर्यादित न राहता, गर्दीत हरविलेल्या नागरिकांना शोधून त्यांचा परिवाराशी पुनर्मिलाफ घडविण्यातही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नवरात्र महोत्सव काळात तुळजापूर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पारंपरिक बंदोबस्ताबरोबरच तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे यंदाच्या महोत्सवात सुरक्षा व्यवस्थेत अधिक काटेकोरपणा आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सांगितले की, “नवरात्र महोत्सव काळात भाविकांचा सुरक्षित व सुरळीत प्रवास हा आमचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी पोलिसांचे मानवी संसाधन व तंत्रज्ञानाचा योग्य संगम साधून एआय पथक कार्यरत केले आहे.”
संपूर्ण तुळजापूर शहरावर पोलिसांची २४ तास नजर राहणार असून, या नव्या उपक्रमामुळे भाविकांमध्येही सुरक्षिततेबाबत विश्वास आणि समाधान वाढणार आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786














