पूरग्रस्त धाराशिव जिल्हा आक्रंदत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा ‘गार डोंगराची हवा’वर ठेका — नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी!
धाराशिव दि. २६ (अमजद सय्यद);“गार डोंगराची हवा बाईला सोसना गारवा” “झाली डगर काळुबाई घ्यावा पदर” या गाण्यावर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी तुळजापूर महोत्सवामध्ये ठेका धरल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. कारण, मागील आठ दिवसांपासून धाराशिव जिल्हा मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून निघाला असून शेकडो गावे पाण्यात बुडाली आहेत, पिकं वाहून गेली आहेत, नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेकडो नागरिक मदतीपासून वंचित आहेत.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना जिल्ह्यात पाणीदार करायचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, जल संपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजीमंत्री आ.प्रा.तानाजीराव सावंत, आमदार कैलास घाडगे-पाटील हे सतत पूरग्रस्तांमध्ये पायाला भिंगरी बांधल्यागत धावपळ करत आहेत. आमदार सुरेश धस यांनी तर हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. मध्यरात्री पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना खासदार निंबाळकर यांनी एनडीआरएफच्या साह्याने बाहेर काढले.
अशा बिकट परिस्थितीत जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी मात्र तुळजापूरच्या महोत्सवामध्ये नृत्याचा आस्वाद घेत असल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते अधिकारीच जर गंभीर नसतील तर इतर कर्मचाऱ्यांनी कसला बोध घ्यावा, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
“पूरग्रस्त शेतकरी मदतीसाठी आक्रंदत आहेत, लेकरांचे दप्तर, घरातील शेवटचे शंभर – दोनशे रुपये पाण्यात वाहून गेलेत, अजूनही काही कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत. आणि अशा काळात जिल्हाधिकारी मात्र महोत्सवात नाचतायत, हे शेतकऱ्यांसह जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात नागरिकांतून कारवाईची मागणी होत असून किमान तुळजाभवानी ट्रस्टमार्फत जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, असे नागरिकांनी आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी व प्रशासनाचा हा वागणुकीतील विसंवाद थांबवून पूरग्रस्तांना तत्काळ मदत पुरविणे हीच खरी वेळेची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य “शोधून लिहिण्याची ताकद “
संपादक अमजद सय्यद 83 90 0887 86
















