रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाईची मागणी
धाराशिव – सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना बांधकामासाठी देण्यात येणारे हप्ते जाणिवपूर्वक रोखून ठेवून मंजूर निधीवरील व्याज स्वतःच्या फायद्यासाठी हडप करणाऱ्या नगर परिषदेतील अधिकारी-कर्मचार्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, मंजूर रक्कम तत्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित अधिकारी-कर्मचारी जाणूनबुजून टाळाटाळ करून रक्कम रोखून ठेवत आहेत. या रकमेवरील व्याज वसूल करून ते विकासकामांसाठी वापरण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आठ दिवसांत पहिला हप्ता रु. १,२५,०००/- लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
या निवेदनावर जिल्हा संघटक विकास बनसोडे, नंदकुमार हावळे, नामदेव वाघमारे, विनोद बनसोडे, आनंद गाडे, किरण धाकतोडे, अक्षय बनसोडे, सचिन गायकवाड, गौतम बनसोडे आदींच्या सह्या आहेत.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












