धाराशिव शहर होर्डिंगमुक्त होण्यास सुरुवात! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नगर पालिकेची तत्पर कृती…नागरिकांचा सुटकेचा निःश्वास
धाराशिव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी मुख्याधिकारी नीता अंधारे यांची निर्णायक सुरुवात
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी):
धाराशिव शहरातील अनधिकृत पोस्टर, बॅनर व डिजिटल होर्डिंग्स या गंभीर प्रश्नावर अखेर निर्णायक हालचाल सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने तसेच नागरिकांच्या वारंवार तक्रारींनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषद प्रशासनाला कडक नोटीस बजावली होती. या नोटिसीनंतर नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांनी होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू केली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अवैध होर्डिंग्स हटवण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला असून “धाराशिव होर्डिंगमुक्त होण्यास सुरुवात झाली” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ (स्वराज्य फाउंडेशन विरुद्ध महाराष्ट्र शासन) या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात नगरपरिषद प्रशासनात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून “बिसले”री पाणी पिणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून आदेश पायदळी तुडवले जात होते.मात्र अभिजीत कदम (युवासेना शहरप्रमुख), राणा बनसोडे (माजी नगरसेवक) आणि प्रवीण केसकर यांनी यासंदर्भात सातत्याने जिल्हाधिकारी व सहआयुक्त यांच्याकडे निवेदन दिले. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकारींना स्पष्ट इशारा दिला की, “शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तातडीने हटवून अनुपालन अहवाल सादर करावा, अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास मुख्याधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल.”
या इशाऱ्यानंतर मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी कारवाईची धडाकेबाज सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अवैध होर्डिंग्स हटवल्यानंतर नागरिकांनी मोकळा श्वास घेत “आता शहर सुशोभित होईल” असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लोकमदत न्यूजने सातत्याने या विषयावर वृत्त दिल्याने अखेर प्रशासनाला हालचाल करावी लागली. त्यामुळे नागरिकांनी लोकमदत न्यूजचे विशेष आभार मानले असून “माध्यमांनी सातत्याने पाठपुरावा केल्यास प्रश्न सोडवला जातो” अशी भावना व्यक्त केली.
शहरातील नागरिकांकडून आता मागणी होत आहे की, भविष्यात अवैध आणि अतिक्रमण करून लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्सवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक उभारावे तसेच नियमभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करावी. यामुळे शहर कायमस्वरूपी स्वच्छ आणि होर्डिंगमुक्त राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लोकमदत न्यूज
संपादक अमजद सय्यद 8390088786












