शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची ठिणगी आता मशाल बनणार – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांकडील कर्ज वसुलीसाठी बँकांच्यामार्फत पाठविलेल्या नोटिसांची होळी करून आंदोलन करण्यात आले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांसमवेत बँकाच्या नोटीसांची होळी करून शेतकऱ्यांच्या आवाजाला धार दिली. अतिवृष्टी, महापूर आणि नैसर्गिक संकटांनी शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. पिके उद्ध्वस्त झाली आहेत, जमिनी खरडून गेल्या आहेत, कुटुंबे संकटात सापडली आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. ही कृती केवळ अमानवीच नाही तर अन्यायकारक आहे..
निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेले कर्जमाफीचे वचन अजूनही कागदावरच आहेत.. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे आणि सरकार मात्र चालढकल करून फसवणूक करत आहे.. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे..शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांचा मुखवटा फाडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत..
आजची ही नोटिसांची होळी म्हणजे केवळ प्रतीकात्मक आंदोलन नाही, तर हा एक इशारा आहे ही ठिणगी आता मशाल बनून पेटणार आहे आणि सरकारला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झुकवून दाखवणार आहे..














