धाराशिव दि.१२ऑगस्ट (प्रतिनिधी) जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित एकदिवशीय पत्रकार कार्यशाळा आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली.या कार्यशाळेत जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे यांनी आणि मराठी भाषा तज्ज्ञ प्रा.दीपक रंगारी यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याविषयावर मार्गदर्शन केले.ते मार्गदर्शन करताना म्हणाले की आज सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर पत्रकारितेत होत आहे.माणूस आणि ए.आय ला बुद्धिमत्ता आहे.आज विविध कंपन्या त्यांच्या उत्पादित वस्तूंची विक्री करण्यासाठी ए.आय चा वापर करत आहेत.गुगल हे ज्या विषयाची आपल्याला माहिती पाहिजे आहे, त्याबाबतची माहिती व लिंक उपलब्ध करून देते.तर चॅट जीपीटी हे विश्लेषण करून माहिती उपलब्ध करून देते.याचा वापर करताना नेमकेपणा महत्वाचा आहे.आज उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर पत्रकारिता क्षेत्रात करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.रुकमे यांनी राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रांमधील सध्याच्या एआय ऍप्सच्या वापराबाबत माहिती दिली.तसेच त्यांनी भाषिणी,गुगल पिन पॉईंट,नोट बुक एल.एम,१२३ अँप याबाबतची देखील माहीती दिली.
मराठी भाषा तज्ज्ञ प्रा.दीपक रंगारी यांनी पत्रकारितेत प्रमाण लेखनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,समाजात भाषा टिकवून ठेवण्याचे काम पत्रकार करतात.भाषा शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते.भोलीभाषेने माणसाला समृद्ध केले. भाषा खेड्यापाड्यात आजही जीवंत आहे असे सांगितले.तसेच त्यांनी मराठी प्रमाणभाषेचे नियम,शब्दांचा अर्थ,व्याकरणाचा योग्य वापर,तसेच मराठी भाषेच्या समृद्धीतील साहित्यिकांचे योगदान याबाबत माहिती दिली.क्रियापदे,शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व-दीर्घ उच्चार,तत्सम-तद्भव शब्दांचे नियम उदाहरणांसह समजावून सांगितले. पत्रकारांनी शब्दकोश आणि लेखनकोश यांचा वापर करून अचूक लेखन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शब्दांचा वाक्यरचनेनुसार आणि संदर्भानुसार होणारा बदलही त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केला.उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे त्यांनी समाधान केले.
दुपारच्या सत्रात प्रारंभी आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले.
विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंपादक रेखा पालवे यांनी पत्रकारांसाठीच्या अधिस्वीकृती नियमावली,आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याविषयी विस्तृत माहिती दिली.
या कार्यशाळेला विविध पत्रकार संघटनांचे अध्यक्ष,पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार उपसंपादक रेखा पालवे यांनी मानले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक नंदू पवार,आशा बंडगर, कनिष्ठ लिपिक दिलीप वाठोरे,मोहन कोळी व अनिल वाघमारे यांनी परिश्रम घेतले.












