‘नटरंग’ आणि ‘चंद्राई’ कला केंद्रांचे प्रस्ताव फेटाळले
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा निर्णय – नियमभंग करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई – पोलिस अधीक्षक रितु खोखर
कलेच्या नावाखाली सुरू दारू विक्री, खास बैठका आणि छुपी गुंतवणूक – प्रशासनाचा वाढता अंकुश
धाराशिव जिल्ह्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या तथाकथित कला केंद्रांवर प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. आळणी येथील ‘नटरंग’ आणि तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील ‘चंद्राई’ या दोन नवीन कला केंद्रांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी त्रुटी असल्यामुळे फेटाळले आहे.
‘नटरंग’ केंद्रासाठी बाबासाहेब घाटे व अक्षय साळुंके, तर ‘चंद्राई’ केंद्रासाठी अरविंद गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केला होता. परंतु सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने आणि संबंधितांवर आधीच नियमभंगाच्या तक्रारी नोंद झाल्याने हे प्रस्ताव नाकारण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव, चोराखळी परिसरात गेल्या काही वर्षांत कला केंद्रांची झपाट्याने वाढ झाली आहे. लावणी व लोककलेच्या नावाखाली काही केंद्रांमध्ये दारू विक्री, डीजे पार्टी आणि नर्तकींच्या खास बैठकींचा गोरखधंदा सुरू असल्याचे पोलिसांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये प्रभावशाली व प्रतिष्ठित मंडळींची छुपी गुंतवणूक असल्याची माहिती प्रशासनाकडे आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच आळणी येथील ‘पिंजरा’ कला केंद्राचा परवाना रद्द केले आहे. तर ‘महाकाली’ कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, पोलिसांचा अहवाल व शपथपत्र कोर्टात सादर होणार आहे, अशी माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी दिली.
‘महाकाली’ कला केंद्रात पूर्वी दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाला होता. त्या प्रकरणी तीन नर्तकी महिलांना अटक करण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखेने नियमभंगाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय कळंब तालुक्यातील वडगाव ज. येथे ‘अंबिका’ कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी अर्ज केला होता, मात्र तो मंजूर करण्यात आलेला नाही. परवानगी न मिळाल्यानंतरही या ठिकाणी देवींच्या फोटोंसह सजावट करून केंद्र सज्ज केले गेले आहे. परवाना नसताना इतका आत्मविश्वास येतो कुठून, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कळंब तालुक्यातच ‘रेणुका’ आणि ‘प्यासा’ कला केंद्रांसाठी सतीश वामन जाधव, श्रीपाल वीर आणि शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. काही केंद्रांमध्ये खरोखर पारंपारिक कला सादर होत असली, तरी काहींच्या गैरप्रवृत्तीमुळे सर्वांचं नाव बदनाम होत आहे, अशी प्रतिक्रिया काही कलाकारांकडून मिळाली आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी स्पष्ट केले की, “कला केंद्रांमध्ये पारंपारिक पद्धतीने लावणी सादर करावी. “बंद” खोलीत “डीजेवर” कार्यक्रम घेणे नियमभंगात मोडते. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहील.” जिल्हाधिकाऱ्यांकडे आतापर्यंत पाच केंद्रांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

दरम्यान, नवीन कला केंद्रांना मंजुरी मिळावी म्हणून सत्ताधारी पक्षातील एका नेत्याच्या पुढाकाराने मुंबईत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेण्यात आली. “मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, अनेक खोल्या बांधल्या, आता परवाना न मिळाल्यास नुकसान होईल,” असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र पालकमंत्री सरनाईक यांनी कोणताही दबाव न मानता स्पष्ट नकार दिला आणि संबंधितांना फटकारले. यानंतर जिल्ह्यात “तो नेता कोण?” याची चर्चा रंगली आहे.











