साई लावणी कला केंद्राविरोधात गुन्हा नोंद परवाना नसताना केंद्र सुरु तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद
धाराशिव दि. १७, (प्रतिनिधी) — मौजे आळणी (ता. धाराशिव) येथील साई लावणी सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र हे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसताना अनधिकृतपणे सुरु असल्याचे उघड झाल्याने, धाराशिव ग्रामीण पोलिसांनी सदर कला केंद्राचे मालक संदीप दिलीपराव कोकाटे (रा. धाराशिव) यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) 2023 च्या कलम 223 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तहसीलदार धाराशिव डॉ. मृणाल प्रकाश जाधव स्वतः हजर राहून फिर्यादीवरून दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर साई लावणी कला केंद्राला यापूर्वीच पोलीस स्टेशनकडून ११ सप्टेंबर २०२५ रोजी गो.क्र. २७३५/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम १६८ नुसार नोटीस देण्यात आली होती. या नोटीसमध्ये रंगभूमी प्रयोग परी निरीक्षण मंडळाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. मात्र, त्या नोटीशनंतरही कला केंद्रात नियमभंग सुरूच असल्याचे निष्पन्न झाले.
२०सप्टे.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप तानाजी वाघमारे यांनी साई लोकनाट्य कला केंद्र आळणी फाटा येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता, पहिल्या मजल्यावर व तळमजल्यावर एकूण सात ते आठ खोल्या आढळल्या. त्यापैकी दक्षिण-पूर्व बाजूच्या खोलीत दोन महिला व चार प्रेक्षक उपस्थित होते. त्यातील दोन महिला नाच करत असल्याचे तर एक व्यक्ती संगीत पेटी व दुसरा ढोलकी वाजवत असल्याचे दिसले. व्यवस्थापकाकडे रंगमंचावरील कार्यक्रमाबाबत विचारले असता त्याने रंगमंच दुरुस्ती चालू असल्याचे सांगून खोलीत नाचकाम सुरु असल्याची कबुली दिली. प्रेक्षकांकडे कोणत्याही प्रकारची तिकिटे नसल्याचेही दिसून आले. या पाहणीवरून शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उघड उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
या अहवालावरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याने २५सप्टे २०२५ रोजी जा.क्र. २९९२/२०२५ अन्वये उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव यांना सदर केंद्राचा परवाना रद्द करण्याबाबत पत्र पाठविले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर २०२५ रोजी जा.क्र ४४६७/२०२५ ने पोलीस अधीक्षक धाराशिव यांना सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांनी ३० सप्टें २०२५ रोजी जा. क्र. जीवीशा/कला केंद्र/परवाना रद्द/२०२५/७३३६ अन्वये जिल्हाधिकारी धाराशिव यांना साई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द करण्याबाबत शिफारस केली.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश क्र.२०२५/उपचिटणीस एमजी-१/कावी-५१६ अन्वये साई लावणी सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचे आदेश जारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदींच्या तपासणीतदेखील साई लावणी कला केंद्रास धाराशिव तहसील कार्यालयामार्फत कोणत्याही प्रकारचा नूतनीकरण परवाना किंवा परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे सदर केंद्र संपूर्णपणे विनापरवाना आणि अनधिकृतपणे सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकारामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या आदेशानुसार तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी आरोपी संदीप दिलीपराव कोकाटे यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 223 अंतर्गत फिर्याद दाखल केली असून पुढील तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












