राजमुद्रा कट्टा नव्या तेजात… युवा उद्योजक राहुल गवळींचा स्वखर्चातून पुढाकार, दिवाळीच्या प्रकाशात उजळला छत्रपती शिवाजी महाराज चौक
धाराशिव (प्रतिनिधी)धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील राजमुद्रा कट्टा अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. वाहने धडकत असल्याने कट्ट्याच्या दोन्ही बाजूंना तुटफूट झाली होती, स्टील रेलिंग मोडून अर्धवट राहिली होती, तसेच परिसरातील लाईटही बंद झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर धाराशिवचे युवा उद्योजक राहुल गवळी यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून राजमुद्रा कट्ट्याची दुरुस्ती केली. दोन दिवस करागिरांसोबत स्वतः श्रमदान करत त्यांनी कट्टा नव्याने दुरुस्त केला. ग्रॅनाईट बसवून, स्टील रेलिंग लावून व बंद पडलेल्या लाईट पूर्वस्थितीत सुरू करून चौकाचे सौंदर्य पुन्हा उजळवले.
दिवाळीच्या स्वागतार्थ राहुल गवळी यांनी हार-फुले, पणती व दिव्यांनी राजमुद्रा कट्टा सजवून दिवाळी साजरी केली. त्यांच्या या उपक्रमामुळे चौक पुन्हा एकदा तेजोमय झाला असून परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे. नागरिकांनी सांगितले की “नगरपालिकेने न केलेले काम एका तरुणाने मनापासून केले, हे प्रेरणादायी आहे.”
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आता नव्या उजेडात झळकणारा राजमुद्रा कट्टा हे स्वयंप्रेरणेने कार्य करणाऱ्या तरुणाईचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
लोक मदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786














