धाराशिव दि.१४ (अमजद सय्यद) – संकल्प महाराष्ट्राच्या आरोग्याचा हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे आरोग्याच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नागरिकांच्या विशेषतः रुग्णांच्या जिवीताशी निगडित असलेल्या वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदी तसेच विद्यार्थी निवासी (हॉस्टेल) इमारत नूतनीकरण, ऑक्सिजन व जीवनावश्यक औषधी यासाठी आवश्यक असलेला निधी नियोजन जिल्हा नियोजन समितीच्या राजकारणाने बरबटून गेलेल्या व केवळ हेवेदाव्यामुळे दिलेल्या… सुडाच्या स्थगिती….मध्ये रखडलेला आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्याचाच श्वास…स्थगितीत…अडकला आहे. विशेष म्हणजे हा निधी २०२३-२४ व २०२४-२५ या सालातील असल्यामुळे जिल्ह्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणाच निधीच्या प्रतिक्षेत लटकलेली आहे.
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय आता रुग्णांना अद्यावत शस्त्रक्रिया करण्यावर भर देऊ लागलेले आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतर होण्याची म्हणजेच रेफरलची प्रक्रिया ठप्प झालेली आहे. रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञांची टीम देखील उपलब्ध झालेली आहे. मात्र, आणखीन आरोग्याच्या सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामग्रीची गरज आहे. त्याशिवाय योग्य उपचार करणे अशक्यप्राय होत आहे. त्या यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला जातो. त्या प्रस्तावास आवश्यक निधीस प्रशासकीय मान्यता देऊन तो ती यंत्रसामुग्री खरेदीसाठी वर्ग करणे अपेक्षित असते. मात्र,
खरेदी करण्यासाठी निधीची नितांत गरज असते. मात्र, यंत्रसामुग्रीचा २०२३-२४ मध्ये १३ कोटी तर विद्यार्थ्यांच्या निवास हॉस्टेल बांधकाम नूतनीकरण ४ कोटी ५१ लाख व ऑक्सिजन व जीवनावश्यक औषधे ५० लाख रुपयांचा निधी स्थगितीत अडकलेला आहे.
नवीन १५ कोटींची प्रस्तावित निधी उपलब्ध होणार ?
या महाविद्यालयात आणखी कामे करणे प्रलंबित आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जातो. २०२५-२६ च्या नियोजित कामामध्ये बांधकाम करणे – ५ कोटी रुपये, यंत्रसामुग्री खरेदी – ५ कोटी रुपये तसेच मेडिसिन, ऑक्सिजन, सर्जिकल साहित्य व कीट केमिकल खरेदी – ५ कोटी असा एकूण १५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र २०२३-२४ पासूनचाच निधी प्रलंबित असल्यामुळे पूर्वीचीच कामे कामे रखडलेली आहेत. तर या नवीन कामांचे काय होणार ? हा प्रश्न अधांतरीच आहे.












