एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई | दि. ३(प्रतिनिधी):राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या मोकळ्या जागांवर आणि बसस्थानकांच्या तसेच कार्यशाळांच्या छतांवर ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाद्वारे दरवर्षी सुमारे ३०० मेगावॉट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपयांची वीज निर्मिती करून एसटीला आर्थिक बळकटी देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई येथे झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळाच्या मालकीच्या मोकळ्या जागांचा उपयुक्त वापर करून ‘सौर ऊर्जा शेती’ विकसित केली जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे एसटी स्वतःची वीज निर्मिती करेल आणि भविष्यातील वीज खर्चात मोठी बचत होईल. सध्या एसटी महामंडळ दरवर्षी १५ मेगावॉट वीज वापरतो ज्यासाठी सुमारे २५ ते ३० कोटी रुपये खर्च येतो. परंतु, भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगासाठी सुमारे २८० मेगावॉट वीजेची गरज लागणार असून, ही वीज सौरऊर्जेतून तयार केल्यास एसटीला दरवर्षी सुमारे १ हजार कोटी रुपयांची बचत होईल.”
सरनाईक पुढे म्हणाले की, “एसटी महामंडळाचा हा ‘सौर ऊर्जा हब’ प्रकल्प राज्यासाठी एक पथदर्शक मॉडेल ठरेल. यामुळे एसटी केवळ प्रवाशांच्या सेवेसाठीच नव्हे तर हरित ऊर्जा निर्मितीतही आघाडीवर राहील.”
परिवहन मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत.
दररोज नवे निर्णय, नव्या कल्पना आणि प्रशासनातील वेगवान हालचालींमुळे सरनाईक यांनी आपल्या कार्यकाळात कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
कर्मचारी वर्गासाठी कल्याणकारी योजना, बससेवा सुधारणा, प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ, तसेच पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून त्यांनी परिवहन मंत्रालयात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












