जलजीवन मिशन योजनेत गंभीर अनियमितता चुकीचे अहवाल सादर करून प्रशासनाची दिशाभूल – विकास बनसोडे
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक विकास बनसोडे यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करत दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बनसोडे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की, त्यांनी दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला माहिती अधिकार अंतर्गत अर्ज सादर केला होता. मात्र, माहिती देण्यास विलंब लावण्यात आला. त्यानंतर त्यांनी अपील अर्ज सादर केल्यानंतर दोन महिन्यांच्या उशिराने अपूर्ण माहिती देण्यात आली. विशेषतः निविदेद्वारे नियुक्त गुत्तेदार आणि योजनांच्या प्रगतीविषयी मागवलेली माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
बनसोडे यांच्या मते, विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही गावांमध्ये ऑनलाईन संकेतस्थळावर १०० टक्के नळजोडणी दाखविण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष तपासणीत केवळ ५० ते ६० टक्के घरांनाच नळ कनेक्शन असल्याचे दिसून आले आहे. “राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची शाबासकी मिळविण्यासाठी काही तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी खोटे अहवाल सादर केले असून, निधी प्राप्त करण्यासाठी चुकीची आकडेवारी नोंदवली आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या या महत्त्वाच्या योजनेत भ्रष्टाचार आणि चुकीची नोंद टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करावी. दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी,” अशी मागणी बनसोडे यांनी केली आहे.
सदर निवेदनासोबत संबंधित माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली कागदपत्रेही त्यांनी संलग्न केली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.












