खामसवाडी (ता. कळंब) : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज खामसवाडी येथे जाऊन विजेच्या तुटलेल्या तारांचा धक्का लागून मृत्यू झालेल्या स्वर्गीय दत्तात्रय उर्फ अनिल गुंड यांच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले.
शेतात काम करत असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे एका कुटुंबाचा आधारच हरपल्याचे सांगत पालकमंत्री सरनाईक भावुक झाले. “हा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक असून, पालकमंत्री म्हणून नाही तर एक संवेदनशील माणूस म्हणून मी या कुटुंबाच्या पाठीशी आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत कुटुंबासाठी तातडीची आर्थिक मदत पोहोचवली. “ही फक्त मदत नसून, नव्याने उभं राहण्याची एक छोटीशी आशा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भेटीदरम्यान अनिल गुंड यांच्या पत्नीने पालकमंत्र्यांना राखी बांधून औक्षण केले. त्यावर प्रतिसाद देताना सरनाईक म्हणाले, “एक भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन.” असा विश्वास सरनाईक यांनी गुंड कुटुंबास दिला.
या वेळी गुंड कुटुंबासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवेदनशील भेटीमुळे गावात पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.












