उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांची कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक
ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार
धाराशिव, दि. १२ नोव्हेंबर :जिल्हा परिषद धाराशिवच्या ग्रामपंचायत विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) अनंत कुंभार यांच्या वर्तनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
या निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे की, कुंभार हे आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांशी अत्यंत तुच्छ व अवमानास्पद पद्धतीने वागतात. प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण करणे, कर्मचाऱ्यांना अवमानजनक भाषेत बोलणे, अभ्यागतांसमोर कर्मचाऱ्यांचा अपमान करणे, तसेच शिस्तभंगाची धमकी देणे असे प्रकार नियमित घडत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही शासन नियमाप्रमाणे व वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार काम पार पाडत आहोत. मात्र कुंभार साहेब प्रत्येक गोष्टीत दोष काढून वारंवार संचिका परत करतात, कर्मचारी हे घरचे नोकर असल्यासारखे वागवतात, तसेच कार्यालयीन वातावरण अस्वस्थ करतात.”
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, वरिष्ठांकडून प्राप्त सूचना अथवा आदेशांची अंमलबजावणी करताना कुंभार साहेब अडथळे निर्माण करतात. आवश्यक संचिकांवर स्वाक्षरी करण्यास विलंब करतात किंवा ती नाकारतात. परिणामी कार्यालयातील कामकाज प्रलंबित राहते आणि सामान्य जनतेशी संबंधित कार्यात उशीर होतो.
कुंभार साहेब आमच्याशी सतत संशयाने पाहतात, आरेरावी करतात आणि कोणतीही चूक नसतानाही आम्हाला जाहीरपणे जलील करतात. त्यामुळे मानसिक ताण निर्माण झाला असून कामकाजावर परिणाम होत आहे,” असेही कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांना हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत राज्याचे ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.या निवेदनावर ग्रामपंचायत विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अनंत कुंभार हे चार वर्षापूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता या विभागांमध्ये धाराशिव मध्ये कार्यरत होते. तेथेही त्यांनी या विभागात हात धुवा मोहीम सक्रियपणे राबविल्याचे चर्चा कर्मचाऱ्यात केली जात आहे. त्यांच्याच काळात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ज्या गावांना पूर्वी निधी मंजूर झालेला होता. अशा काही मोठ्या ग्रामपंचायतींना दुसऱ्यांदा निधी मंजूर केलेला आहे.शासकीय वाहनाचा नियमित नियम बाह्य वापर करणारे अधिकारी म्हणून यांची ख्याती आहे. दररोज लातूरच्या दिशेने दौरा करायचा व वाहनाच्या धाव पुस्तिकेमध्ये दुसऱ्याच ठिकाणचा दौरा दाखवायचा असा यांचा नेहमी धंदा आहे. शासनाच्या सर्व योजनांचा ताळमेळ घालून शंभर टक्के फायदा घेणारे हे नामांकित अधिकारी आहेत .त्यांच्यावर जिल्हा परिषद ceo यांनी विशेष चौकशी समिती गठीत करून त्यांच्या सर्व कामाची तपासणी करावी अशी मागणी केली जात आहे.
कुंभार हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) या पदावर कार्यरत असताना सुद्धा जिल्हा परिषद मधील त्यांच्या जुन्या तत्कालीन विभागातील काही कंत्राटी कर्मचारी त्यांचे सर्व अर्थपूर्ण व्यवहार व जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग संभाळत आहेत अशी चर्चा जिल्हा परिषदेमध्ये हे रुजू झाल्यापासून सुरू आहे.












