बसचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचा पंचसूत्री आराखडा तयार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसचे उत्पन्न वाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करीत, सुधारणा ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या दोन चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केला असल्याची विशेष माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई येथील मंत्रालयातील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. तर एसटीच्या व्यवस्थापनासाठी दररोज सकाळी १० वाजता आगारात, ११ वाजता विभागात आणि १२ वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तर दुपारी ४ ते सायंकाळी ६ या दरम्यान आगार, विभाग व प्रदेश स्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच – डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक आहे. त्यामुळे KPTL अर्थात प्रती किलो मीटर १० लीटर असे चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. विशेष म्हणजे KPTL कमी असणाऱ्यांना समुपदेशन, प्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आखले असल्याची मंत्री सरनाईक यांनी सांगितले. तसेच
तिकीट विक्री ही महसुलाची जीवन वाहिनी असल्यामुळे वाहकांना आगाराच्या दैनंदिन CPKM अर्थात संचित प्रती किलो मीटर उत्पन्न या प्रमाणे उत्पन्नाचे स्पष्ट उद्दिष्ट देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर एसटीचे वेळापत्रक हा वाहतूक यंत्रणेचा ‘आत्मा’ मानला जातो. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारींची दखल घेत आता सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जात आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱ्याच राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच
१ जानेवारीला बस स्थानकनिहाय नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची व्यापक प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान ८० टक्क्यांपेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता आणि प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या ‘दत्तक’ तत्त्वावर बस फेऱ्या देणे अशा अनेक सुधारणा लांब व मध्यम पल्ल्यांच्या व्यवस्थापनामध्ये होत आहेत. तर ऑनलाईन व मोबाईल ॲपद्वारे आरक्षणाला मोठे प्रोत्साहन देण्याचा मानस असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. तसेच
स्वच्छ व टापटीप बस स्थानके, प्रसाधन गृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती, पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक नजरेस आणणे, अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे तक्रारींची तातडीने दखल, नोंद आणि निराकरण यावर आगार व्यवस्थापकांना विशेष भर देण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
संपादक अमजद सय्यद 8390088786












