लोकमदत न्यूज एक्सक्लुसिव्ह
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची एमआरआय तपासणीसाठी होणारी ससेहोलपट आता अखेर थांबणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात अत्यावश्यक ठरणारी एमआरआय मशीनची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांना सोलापूर किंवा महागड्या खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी धाव घ्यावी लागत होती.
एमआरआय मशीनसाठी वारंवार मागणी करण्यात आली, आंदोलने झाली, निवेदने देण्यात आली, पण लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन आणि कागदावरील घोषणांपलीकडे काही घडले नाही. मात्र धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाल्यानंतर आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेला गती मिळाली. अनेक आधुनिक यंत्रसामग्री, ऑपरेशन थिएटरमधील साधनसामुग्री उपलब्ध झाली आणि नागरिकांना बाहेरील जिल्ह्यांत जाण्याची वेळ मोठ्या प्रमाणावर कमी झाली.
अखेरीस, दीर्घ प्रतीक्षेनंतर एमआरआय मशीन धाराशिवमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मशीन दि. २० ऑगस्टपर्यंत धाराशिवमध्ये येणार असून सप्टेंबरपासून रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या सुविधेमुळे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून उपचार प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
“लोकमदत न्यूज – सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद 8390088786












