उठा उठा निवडणूक आली… कार्यकर्त्यांना वेड्यात करण्याची वेळ झाली!
धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये निष्ठावंतांची फसगत आमिषावर राजकारण रंगले!
धाराशिव दि.२०(अमजद सय्यद): धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताच शहरातील अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदान गाठले. वर्षानुवर्षे मतदारसंघातील आरोग्य, पाणी, लाईट, स्वच्छता अशा नागरी समस्यांवर काम करत आपले राजकीय अस्तित्व निर्माण करणाऱ्या आणि पक्षासाठी जीवाचे रान करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना यंदा उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र, उमेदवारी जाहीर होताच काही कार्यकर्त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. पक्षाच्या हितासाठी, बूथ प्लससाठी, जनतेच्या समस्यांसाठी रात्रंदिवस झगडणाऱ्या निष्ठावंतांना दुर्लक्षित करून काही ठिकाणी केवळ नेत्यांना खुश ठेवणाऱ्या व जवळच फिरणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली असल्याचे दिसून येत आहे.
पक्ष नेतृत्वाकडून ‘काम करणारे कार्यकर्ते’ नव्हे तर ‘स्तुती करणारे चेले’ अधिक महत्त्वाचे मानले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून समाजसेवा करत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना न जुमानता, फक्त नेत्यांच्या जवळीकतेवर आधारित तिकीटवाटप झाल्याने कार्यकर्त्यांची फसगत झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले हे कार्यकर्ते आता पक्षाकडून मिळणाऱ्या विविध आमिषांचे लक्ष्य होऊ लागले आहेत. त्यांना पुन्हा खुश करण्यासाठी पक्ष नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवक, पक्षपदे, विकास कामांतील सहभाग यासारख्या आश्वासनांचा पाऊस सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.
धाराशिव नगरपरिषद ही अ दर्जा असलेली नगर परिषद एकूण 41 सदस्यांची असून यामध्ये केवळ 3 ते 4 जागाच स्वीकृत (क्रॉप नगरसेवक) नगरसेवकांसाठी असतात. तरीदेखील काही पक्षातील नेत्यांनी २० ते २५ कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य करण्याचे आश्वासन दिले असल्याची चर्चा शहरात ऐकू येत आहे. निवडणुकीची धावपळ सुरू असताना अशा आश्वासनांची जंत्री दाखवून नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या इच्छुकांकडेही आता माघारीसाठी हाच ‘स्वीकृत सदस्य’चा लॉलीपॉप दाखवला जात असल्याचे म्हटले जात आहे. उद्या माघारीचा शेवटचा दिवस असल्याने हे राजकारण आणखी रंग घेण्याची शक्यता आहे.
राजकीय कार्यकर्ते वर्षानुवर्षे समाजासाठी, पक्षासाठी, जनतेसाठी कंबर कसून काम करतात. पण निवडणुकीत त्यांचे योगदान विसरले जाते आणि निवडणूक जवळ आली की “उठा उठा निवडणूक आली, कार्यकर्त्यांना वेड्यात करण्याची वेळ झाली” अशा शैलीत त्यांना फक्त आश्वासनांचे आमिष दाखवले जाते. या लॉलीपॉप राजकारणाला यावेळी किती कार्यकर्ते बळी पडतात आणि किती जण आपली नाराजी कायम ठेवतात, किती कार्यकर्ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












