प्रभाग क्रमांक 14 मध्ये दुरंगी लढत! शिवसेना–राष्ट्रवादी आमनेसामने
शौकत शेख (शिवसेना उ.बा.ठा.) – दांडगा जनसंपर्क, संघटनशक्ती आणि तत्पर कामगिरी
आयाज उर्फ बबलू शेख (राष्ट्रवादी शरद पवार) – शांत मदतकार, अदृश्य सामाजिक कार्य आणि प्रशासनिक पकड
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मध्ये दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. या प्रभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कळंब–धाराशिव मतदारसंघ अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शौकत भाई शेख तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून शहराध्यक्ष आयाज उर्फ बबलू शेख हे दोन बलाढ्य दावेदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
दोन्ही उमेदवार प्रभागातील नागरिकांशी घट्ट नाते ठेवणारे, संकटाच्या प्रसंगी धावून मदत करणारे आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे म्हणून ओळखले जात असल्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षांतली नसून दोन लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांतील प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.
शिवसेनेचे शौकत शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील दैनंदिन प्रश्नांवर सातत्याने लक्ष देणारे कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. छोट्या–मोठ्या तक्रारींपासून ते रस्ते, पाणी, लाईट, स्वच्छता, सरकारी योजनांमध्ये नागरिकांना मदत, अशा विविध मुद्द्यांवर तातडीने प्रशासनाशी संपर्क साधत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाधानकारक तोडगा त्यांनी शोधला आहे. नागरिकांच्या अडचणीमध्ये प्रत्यक्ष हजर राहणे, ‘काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा’ या भूमिकेमुळे त्यांना प्रभागात मजबूत पकड मिळाली आहे. युवावर्गात प्रभाव, संघटना कौशल्य, शिवसेनेची सक्रिय कार्यपद्धती आणि थेट जनसंपर्क या बळावर ते विजयाचा दावाही ठामपणे करत आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विद्यमान शहराध्यक्ष बबलू शेख यांनी अनेक वर्षांपासून कसलाही गाजावाजा न करता अदृश्य सामाजिक कामाच्या माध्यमातून जनाधार निर्माण केला आहे. वैद्यकीय उपचारांची मदत, शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, विधवा–अपंगांना आधार, रोजगारासाठी सहकार्य, तसेच संकट काळात केलेली आर्थिक, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी योग्य मार्गदर्वशन व स्तुसहाय्य मदत या कामांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव प्रभागातील युवा वर्गांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच पातळ्यांवर जाणवत आहे. मदतीचे प्रदर्शन न करता, शांतपणे सहकार्य करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे अनेक कुटुंबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला दिसतो. शहराध्याक्ष पदामुळे पक्ष संघटनेचे बळ, प्रशासनाशी जवळीक आणि तातडीने प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्या बाजूने निर्णायक ठरू शकते, असे मतदारांतून ऐकायला मिळते.
प्रभाग 14 ची बाजी कोण मारणार?
या दोन्ही उमेदवारांची वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर ही निवडणूक केवळ मतांची नसून कार्यशैली व व्यक्तिमत्त्वांची तुलना ठरणार आहे. एकीकडे संघटित आक्रमक जनसंपर्काचा जोर तर दुसरीकडे शांतपणे लोकांना दिलेल्या आधाराची ताकद – या दोन भिन्न कार्यपद्धतींपैकी कोणत्या शैलीला जनतेची पसंती मिळणार? याची उत्सुकता वाढत आहे.
स्थानिक उमेदवार, स्थानिक मुद्दे, स्थानिक नेतृत्व आणि नागरिकांशी घट्ट जोडलेले संबंध या चार घटकांमुळे प्रभाग क्रमांक 14 मधील निवडणूक ही धाराशिवच्या राजकीय रंगभूमीवर सर्वाधिक लक्ष वेधणारी ठरत असून या दुरंगी लढतीचे परिणाम शहराच्या राजकारणात दूरगामी परिणाम घडवतील, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
आता सगळ्या नजरा या प्रश्नावर खिळल्या आहेत
शौकत शेख की अय्याज (बबलू) शेख कोण मारणार बाजी?
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












