लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये मातंग समाजाचा भाजपवरील विश्वास दृढ
धाराशिव (प्रतिनिधी : लोकमदत न्यूज):आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे धाराशिव युवक जिल्हाध्यक्ष महेश देडे आणि तालुकाध्यक्ष मुकेश देडे यांनी आपल्या मातंग समाजातील अनेक बांधवांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. भाजप नेते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. पाटील यांनी सर्वांचे स्वागत करीत त्यांच्या निर्णयाचे अभिनंदन व्यक्त केले आणि मातंग समाजाच्या या विश्वासाचे मनापासून स्वागत असल्याचे सांगितले.
या प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विशेषतः धाराशिव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपा उमेदवारांना या निर्णयाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. “समाज विकासाच्या मार्गावर एकत्र येत असल्याने धाराशिवमध्ये बदलाचा नवा अध्याय सुरू होणार आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या १ कोटींच्या निधीबाबत बोलताना ते म्हणाले की, “शासकीय दूध डेअरीच्या जागेवर हे भव्यदिव्य स्मारक उभे राहील. यासाठी आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असून लवकरच या स्मारकाचे काम सुरू होणार आहे.” मागासवर्गीय समाजाला सन्मानासहित न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे पाऊल महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, दिनेश बंडगर, विलास लोंढे, बापू पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते. भाजपा प्रवेशामुळे निवडणुकीचे वातावरण आणखी रंगतदार होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












