पालकमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली! धाराशिव बसस्थानकातील उपहारगृहातील गलिच्छ व्यवस्थापनावर प्रवाशांचा संताप!
धाराशिव बसस्थानकातील उपहारगृहात अस्वच्छतेचा ‚महाभोंडाळा’ — सरनाईक यांच्या दंडानंतरही स्थिती ‘जैसे थे’
धाराशिव : राज्याचे परिवहन मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशाची जाणीवही स्थानिक एसटी अधिकाऱ्यांना नाही की काय, असा सवाल प्रवासीवर्गातून उपस्थित केला जात आहे. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिलेले निर्देश, ठोठावलेला 5000 रुपयांचा दंड, आणि स्वच्छतेबाबतची स्पष्ट ताकीद… तरीही धाराशिव बसस्थानकातील उपहारगृहातील परिस्थिती आजही जैसे थे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
मागील दौऱ्यात पालकमंत्री सरनाईक यांनी अचानक बसस्थानकाला भेट देत उपहारगृहातील अस्वच्छतेवर संताप व्यक्त केला होता. अन्नपदार्थ ठेवण्याच्या जागी असलेली मोठी अस्वच्छता, कचरा, स्वयंपाकघरातील घाण, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची दुरवस्था—या सर्वांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी तत्काळ कॅन्टीन चालकावर 5000 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. मात्र, दंड झाल्यानंतरही स्वच्छतेचा लवलेश दिसत नसल्याने “अधिकारीच चालकांना पाठीशी घालत आहेत का?” असा संतप्त सवाल आता उभा राहिला आहे.
याहून धक्कादायक म्हणजे पालकमंत्री धाराशिवला येत असल्याचे समजताच या उपहारगृहात अचानक ‘स्वच्छता मोहीम’ सुरू करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांची भेट ठरलेली असल्यानेच ही तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.
एरवी मात्र उपहारगृहात ना स्वच्छतेची काळजी, ना अन्नाची गुणवत्ता, ना सुरक्षेबाबतचे नियम—या तिन्ही गोष्टींचा मागमूसही नसल्याची तक्रार आहे.
प्रवाशांचा एकच सवाल
“पालकमंत्र्यांच्या भेटीच्या दिवशीच स्वच्छता? बाकीच्या ३६४ दिवसांचे काय?”
आगार व्यवस्थापकांनी याबाबत जबाबदारी घेतली पाहिजे असताना, तेच उपहारगृह चालकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप अधिक गंभीर मानला जात आहे. संबंधित आगर व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही.
आता मोठा प्रश्न असा की —
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आज पुन्हा धाराशिवच्या बसस्थानकाला भेट देणार आहेत. तेव्हा ते गेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करतील का? केवळ दंड नव्हे तर काटेकोर कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवतील का?
प्रवासीवर्गाचीही स्पष्ट मागणी आहे —
“दंडाचे नाटक नको, कायमस्वरूपी स्वच्छता आणि जबाबदारी निश्चित करा!”
धाराशिव बसस्थानकातील उपहारगृहातील अस्वच्छतेचा हा प्रकार प्रशासनातील शिथिलतेचे प्रतिबिंब दाखवणारा असून पालकमंत्री आता कोणती ठोस पावले उचलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786




















