तामलवाडी प्रकरणात तडकाफडकी कारवाई, अन् धाराशिवात ‘दिरंगाई’ ?
पोलिस अधीक्षकांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह ?
धाराशिव दि.०८ (प्रतिनिधी) – सद्रक्षणाय खलनिग्रहणाय….या ब्रीदनुसार सर्वसामान्यांचे रक्षण आणि गुन्हेगारांना शिक्षा देणे हे कर्तव्य आहे. यावरच संपूर्ण पोलीस प्रशासनाचा कारभार चालत असून जनतेचा देखील विश्वास या ब्रीदावरच मोठ्या प्रमाणात सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असल्याचे दिसून येते. मात्र, हल्ली वरील ब्रीद वाक्याला थेट बाजुला सारुन छेद देण्याचे काम जिल्हा पोलिस प्रशासनात सुरु आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक यांच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहर पोलीस ठाण्यात झिरो-तोतया पोलिसाच्या माध्यमातून ….खरे वर्दीत…. वअसलेलेसुली बहाद्दर वेगवेगळ्या प्रकारच्या हप्त्याच्या माध्यमातून मोठी वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांनी अद्यापपर्यंत त्याबाबत मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका का घेतली आहे ? विशेष म्हणजे झिरो-तोतया याच्या जीवावर खाकीतला तो हफ्तेखोर… दलालीत आर्थिक हिरो…. झाला असून त्याला नेमके कोणाचे आणि का पाठबळ मिळत आहे ? तसेच आणखी कोणाकोणाचे हात बरबटलेले आहेत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील कारभाऱ्यांवर अवैध आर्थिक तडजोडी, झिरो, तोतया कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले कथित व्यवहार, व्हायरल व्हिडिओ, रस्त्यावर वाहन थांबवून घेतल्या जाणाऱ्या ‘तोडपाण्या’, आणि इतर विविध तक्रारी असताना कारवाई न केल्यामुळे जनतेत प्रचंड संताप उफाळला आहे. दरम्यान, तामलवाडी पोलिसांवर व्हायरल व्हिडिओनंतर तात्काळ निलंबनाची कारवाई केली. मात्र, मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरातील आठवडी बाजार परिसरातील केळीच्या गाड्यावर पिशवी व्यवहार प्रकरणात १५ दिवस उलटले तरी चौकशीचा वेग थंड असल्यामुळे पोलिस दलाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र.486/2025 (म.दा.का. 65) मधील मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गंभीर आरोप जिल्हा पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केला आहे. त्यामध्ये दारूच्या बाटल्यांच्या जप्तीमध्ये मोठी तफावत, वाहनांची कथित ‘तडजोडी’ने सोडवणूक आणि संबंधित पोलीस नाईक विष्णू बेळे याच्यावर केलेले आरोप सर्वत्र चविने चर्चेत आहेत. तर दि.२३ नोव्हेंबर रोजी धाराशिव शहरातील ताजमहाल टॉकीजजवळ एका रिक्षाला अडवून कथितरीत्या रक्कम मागण्यात आली, ती थेट न स्वीकारता केळीच्या गाड्यावरील कॅरीबॅगच्या खाली ठेवण्यास सांगण्यात आल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट चर्चेत समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून रिक्षाचालकाने थेट एसपींकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र तक्रार दाखल करण्यात येऊ नये यासाठी त्यावर दबाव टाकला जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
धाराशिव शहरात ‘झिरो-तोतया’ म्हणून ओळखला जाणारा गट रस्त्यावर वाहन अडवून, अवैध वाहतुकीवर तोडपाणी घेऊन, काही वेळा स्वतःला पोलीस असल्याचे भासवून पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध भागातील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी दागिने-रोख रक्कम सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस रॅकेटमध्येही ‘झिरो’ गटाचाच सहभाग असल्याचे उघड उघड बोलले जात आहे. तुळजापूर तालुक्यातील
तामलवाडी येथील व्हिडिओनंतर चार पाच दिवसात संबंधित पोलिसावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. मात्र, धाराशिव झिरो-तोतया प्रकरणात ना नोटीस काढण्यात आली, ना अहवाल तयार झाला, ना चौकशी समिती स्थापन झाली. निलंबन तर दूरच राहिले. त्यामुळे शहरभर एकच चर्चा सुरू आहे “तामलवाडीत वेग… धाराशिवात ब्रेक! वरदहस्त कोणाला व कशासाठी ?”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओतील रिक्षाचालकाची अधिकृत तक्रार एसपींकडे दाखल होऊ नये म्हणून वरिष्ठ स्तरावरुन मोठा दबाव आणला जात आहे. त्यामुळे प्रकरणाला नवे राजकीय व प्रशासकीय वळण मिळाले आहे.
जिल्ह्यात तोतया पोलिसांच्या नावावर अनेक नागरिकांची लूट झाल्याची चर्चा असून, पीडित नागरिकांसमोर झिरो-तोतया कर्मचाऱ्याची ओळख परेड घेण्यात आली तर अनेक प्रकरणांचा उलगडा होऊ शकतो, असा सूर नागरिकांमधून उमटू लागला आहे. तसेच तामलवाडीतील जलद कारवाईनंतर धाराशिव शहरातील पिशवी व्यवहार, अवैध दारू तडजोड, झिरो पोलिसांच्या कारवाया, रस्त्यावर रक्कम उकळणे आदींसह सर्व प्रकरणांवर तितकीच कडक कारवाई होईल, अशी आशा व अपेक्षा नागरिकांना लागून राहिली आहे. मात्र, दहा दिवसांपासून चौकशी धुळ खात पडत असल्यामुळे शहराचा प्रश्न अधांतरी का ? “तामलवाडीप्रमाणे धाराशिवातही कडक कारवाई होईल का ? की सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीस संरक्षण मिळत राहील ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तामलवाडी प्रकरणात प्रशासनाने दाखविलेला वेग आणि धाराशिवमधील प्रकरणांवर होणारा विलंब यातला हा प्रचंड विरोधाभास जनतेच्या नजरेतून सुटलेला नाही. “न्याय तामलवाडीसाठी वेगळा आणि धाराशिवसाठी वेगळा का?” हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रितू खोखर हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, कठोर आणि नियमांनुसार काम करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु, धाराशिव शहरातील प्रकरणांबाबत कारवाई लांबणीवर टाकली जात असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. गंभीर तक्रारींवर कारवाई न झाल्याने असंतोष वाढत असून पारदर्शकतेचा अभाव स्पष्ट होत आहे. न्याय प्रक्रियेत एकसमान निकष आवश्यक असताना दोन प्रकरणांतील भिन्न गतीने पोलिसांची प्रतिमा धुळीस मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













