धाराशिव प्रशालेत ‘विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये’ या विषयावर कार्यशाळा
धाराशिव –
शहरातील धाराशिव प्रशाला येथे मंगळवारी (दि. 30) विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पी.एस. जाधव तर मार्गदर्शक म्हणून धाराशिव पोलीस दलातील दीपक लाव्हरे पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमात पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये असताना शिक्षकांनी सांगितलेली शिस्त अंगीकारावी. त्यामध्ये गणवेश, केशरचना, वैयक्तिक वर्तन योग्य असावे असे सांगितले. तसेच व्यसनाधीनतेमुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरीता असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. आपल्यावर आलेल्या संकटातून आपला बचाव करण्यासाठी तसेच काही अनुचित प्रकार होत असेल तर त्याची माहिती टोल फ्री नंबर 112 वर संपर्क करुन देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












