धाराशिव जिल्हा ‘कला’केंद्रमुक्तीची घोषणा हवेतच विरली — पालकमंत्री सरनाईकांचे आदेश धाब्यावर, प्रशासनाची गुप्त मेहेरबानी उघड!
भाग एक….
धाराशिव (अमजद सय्यद):जिल्ह्यातील कला केंद्रमुक्तीबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी जाहीरपणे केलेली घोषणा प्रत्यक्षात केवळ कागदावरच उरल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे.काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने तात्पुरती कागदपत्री कारवाई करत काही केंद्रे बंद केली, मात्र प्रत्यक्षात छुप्या मार्गाने कला केंद्रांचा अवैध व्यवसाय पुन्हा तेजीत सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
साई कला केंद्र, पिंजरा कला केंद्र, गौरी कला केंद्र, कालिका कला केंद्र व तुळजाई कला केंद्र ही पाच केंद्रे नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित कला केंद्रे सिल करण्याचे आदेश दिले होते. मात्र दिवाळीच्या सुट्ट्यांचा आधार घेत काही केंद्रे काही दिवस सुरूच ठेवण्यात आली. लोकमदत न्यूजमध्ये हा प्रकार प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि तत्काळ दखल घेत कलाकेंद्रे सिल करण्यात आली.
मात्र आता पुन्हा एकदा धक्कादायक बाब समोर येत आहे. सिल करण्यात आलेली काही कला केंद्रे मागील दाराने पुन्हा सुरू झाली असून काही ठिकाणी तर सिल न केलेल्या खोल्यांमध्ये उघडपणे ‘कला’ सादरीकरण सुरू असल्याचे शेजारील गावकऱ्यांनी (विश्वसनीय सूत्र) लोकमदत न्यूज च्या प्रतिनिधींना सांगितले आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले असतानाही त्यांच्या आदेशांना स्थानिक प्रशासनाने अक्षरशः केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या अवैध धंद्यामागे मोठा ‘हप्तेखोरीचा नवा पॅटर्न’ कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे. इतकी गंभीर प्रकरणे उघड होऊनही तत्काळ आणि कठोर कारवाई होत नसेल तर या धंद्याला नेमके अभय कोणाचे, हा प्रश्न संपूर्ण जिल्हा विचारू लागला आहे.
लोकमदत न्यूज या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत असून, या अवैध नेटवर्कमागील प्रत्येक चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आपली शोध पत्रकारिता सुरूच राहील, असा निर्धार देखील व्यक्त करत आहे.
भाग दोन लवकरच…
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












