धाराशिव शहरात नाली–फुटपाथ कामात भ्रष्टाचाराचा घाणेरडा खेळ!राजाभाऊ राऊतांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रारीचा भडका—चौकशी नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरातील रायगड फंक्शन हॉल ते पोलीस लाईन पेट्रोल पंप दरम्यान सुरू असलेल्या नाली व फुटपाथ कामात गंभीर निकृष्ट दर्जा, नियमबाह्य बांधकाम व शासन निधीच्या लुटीचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी आर.पी.आय. (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी थेट जिल्हाधिकारी धाराशिव व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्याकडे लेखी निवेदन देत संताप व्यक्त केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामात पीसीसी व बेड काँक्रीट न करता फक्त खोदकाम करून काम सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. काही ठिकाणी काम अर्धवट, तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद अवस्थेत असून, फेरीवाले व स्थानिक विक्रेत्यांच्या आडून केवळ काम सुरू असल्याचा दिखावा केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
राजाभाऊ राऊत यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सन 2025 मधील सार्वजनिक बांधकाम नियम, नगरविकास नियम (कलम 12, 15, 18), मापन पुस्तिका (Measurement Book) व मंजूर आराखड्यांचे सर्रास उल्लंघन करून काम सुरू आहे. पाणी निचरा, नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुलभता या मूलभूत बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे खडककाम न करता, कडक मुरूम न टाकता, दबई न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून, संबंधित उपविभागीय अभियंता व अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ठेकेदार व अधिकारी संगनमताने शासनाचा निधी लाटत असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी
✔️ उच्चस्तरीय तांत्रिक व प्रशासकीय चौकशी,
✔️ नियमबाह्य काम रद्द करून नव्याने दर्जेदार काम,
✔️ दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करणे,
✔️ काम पूर्ण होईपर्यंत कडक देखरेख
यांची ठाम मागणी करण्यात आली आहे.
राजाभाऊ राऊत यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
महत्त्वाचे म्हणजे, हे निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव तसेच अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धाराशिव यांना देण्यात आले असून, प्रशासन आता काय कारवाई करते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.













