नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
धाराशिव,दि.०२ जानेवारी (प्रतिनिधी) : आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात आज राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण करण्यात आले.गेल्या २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले. डॉक्टरांनी जास्तीत जास्त लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी, आपण चांगले काम करावे तसेच तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
आरोग्य सेवा आयुक्तालय,मुंबई येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमात आज १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्रांचे वितरण करण्यात आले.यापूर्वी नुकतेच १५० डॉक्टरांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ करण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३४५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्रे देण्यात आली असून,उर्वरित सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिन्याभरात क्षमापण पत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार असून,याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य विभागात सन २००९ पूर्वी अनेक वैद्यकीय अधिकारी अस्थायी स्वरूपात कार्यरत होते.सन २००९ मध्ये या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश करण्यात आला.मात्र ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ नसल्यामुळे त्यांना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागत होते. या बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनांकडून वारंवार मागणी होत होती.त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड कालावधी क्षमापित करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामुळे त्यांना विविध आर्थिक व प्रशासकीय लाभ मिळणार आहेत.
आरोग्यव्यवस्थेत समर्पित सेवा देण्याचा निश्चय करूया.या निर्णयामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होईल,असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
नक्षलग्रस्त,आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासह विशेष प्रोत्साहन (इन्सेंटिव्ह) देण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली असून उपचारासाठी मान्य आजारांची संख्या २३९९ करण्यात आली आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मानधनातही भरघोस वाढ करण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी उपसचिव केंद्रे, सहसंचालक.राजेंद्र भालेराव, अवर सचिव .गायकवाड,मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती कारेगावकर तसेच आरोग्य विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












