अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी विनामूल्य शासकीय जागा शासन आदेश जारी, पाठपुराव्याला यश : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सतत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या शासन आदेश शुक्रवारी निर्गमित करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर पूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या आदेशान्वये नगरपालिकेचे ₹ २ कोटी वाचणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारणीच्या अनुषंगाने सोमवारी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘मित्र’ चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यांनी दिली आहे.
धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच आपण ₹ १.५० कोटी निधी मंजूर करवून घेतला आहे. पालिका निवडणुकीच्या अगोदर शहरात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अभिवचनही आपण वचननाम्याच्या माध्यमातून शहरवासीयांना दिले होते. तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे जागेच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे ₹ २ कोटी ८ लाख भरणे आवश्यक होते. पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. मात्र शासनाने विशेष बाब म्हणून सदर रक्कम माफ करावी यासाठी आपले प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले असून त्यावर आपल्या महायुती सरकारने मागील पंधरवड्याखाली शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार राज्य सरकारने तसा आदेश जारी केला आहे. शहरातील हे स्मारक भव्य, दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात साकारण्याचा.मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यासाठी सोमवारी शासकीय विश्राम गृह येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्मारकासाठीच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला होता. त्यानुसार धाराशिव नगरपालिकेला सर्व्हे क्रमांक ४२६ येथील स्मारकासाठी आवश्यक असलेली १ एकर जमीन भोगाधिकार विनामूल्य, मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आता जागा पालिकेकडे वर्ग करण्याच्या नियमांसह शासन आदेश शुक्रवार ९ जानेवारी रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता सोपा झाला आहे. स्मारक उभारणीच्या प्रयत्नांना आता अधिकृत आणि ठोस स्वरूप प्राप्त झाले आहे. जमीन नगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पुतळा उभारणीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया राबवून सर्व परवानग्या देण्यात येणार आहेत. उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया वेगाने आणि वेळेत पूर्ण पार पाडण्यासाठी आपण अखेरपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तात्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवादही मानले आहेत.
स्मारकासाठी सर्वांचा लोकसहभाग आवश्यक : आमदार राणाजगजितसिंह पाटील
जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पहिले भव्य स्मारक साकारले जात आहे. याठिकाणी पूर्णाकृती पुतळ्यासह सुसज्ज बगीचा व अभ्यासिकाही उभारली जाणार आहे. या ऐतिहासिक आणि भव्य स्मारकासाठी सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः रु. १ लाख जाहीर केले आहेत. पुढील नियोजनाच्या दृष्टीने सोमवारी समाजबांधवांसह अण्णा भाऊंवर प्रेम करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांची बैठक शिंगोली सर्किट हाऊस धाराशिव येथे सकाळी ११.३० ,वाजता आयोजित करण्यात आली त्यासाठी उपस्थित रहावे.या स्मारकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या विचारांची, साहित्याची व दैदिप्यमान सामाजिक लढ्याची स्मृती जिवंत राहणार आहे. आणि त्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.












