दर्गाह उर्स मध्ये भाविकांचा वाढता प्रतिसाद… करमणूक (पाळणे) दुकानदारांनी तिकिटात केली ३० टक्के कपात भाविक भक्तांनी लाभ घ्यावा
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) – येथील हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) यांचा उरुस सुरू आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. उरूस संपला असला तरी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी करमणुकीची साधने असलेल्या विविध प्रकारच्या पाळणा व करमणूक व्यावसायिकांनी आपल्या नियमित तिकिट दरामध्ये थोडी थोडकी नव्हे तर चक्क ३० टक्क्यांची घसघशीत कपात केली आहे. त्यामुळे अनेकजण या करमणुकीच्या साधनाचा देखील मनमुराद आनंद घेत आहेत.
धाराशिव शहरातील हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) यांच्या उरूसाला मोठ्या भक्तिमय वातावरणात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थितीत व संदल मिरवणुकीने परंपरेनुसार प्रारंभ झाला. हा दर्गाह भारतातील तीन नंबरचा प्रसिद्ध दर्गाह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाविक देशाच्या विविध भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने दर्शनासाठी न चुकता येऊन आपली हजेरी लावतात. या उरूस दरम्यान धार्मिक कार्यक्रमाबरोबरच पाळणे व इतर मनोरंजन खेळ आणि विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीचे वेगवेगळे स्टॉल्स देखील लावले जातात. तसेच खवय्यांसाठी देखील वेगवेगळ्या प्रांतातील मात्र स्वादिष्ट, चविष्ट आणि रुचकर अशा प्रकारची मेजवानी या ठिकाणी दुकानदारांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली असते. पवित्र उर्स दरम्यान विविध जाती-धर्माच्या मानकर यांना मान देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे नागरिक हा उरूस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. उरुस दरम्यान बहारदार कव्वाली गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. नुकताच हा उरूस संपलेला आहे. मात्र, भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असून आणखी तीन – चार दिवस या ठिकाणी हा भाविकांचा ओघ कायम राहणार आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन sarw पाळणा व इतर मनोरंजन करण्यासाठी आलेल्या दुकानदारांनी त्यांच्या नियमित तिकीट दरामध्ये ३० टक्क्यांनी कपात केलेली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.














