मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल
धाराशिव,दि. 21-देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम मशीन हेच कारण आहे. भाजपा प्रत्येक निवडणुकीत इव्हीएमच्या जोरावर सत्ता काबीज करत आहे. म्हणून इव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस पक्ष सातत्याने करत आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे धाराशिव जिल्हा दौर्यावर आले असता बुधवार, दि. 21 जानेवारी रोजी सकाळी त्यांनी हॉटेल किंग्ज गार्डन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धाराशिव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, नगर परिषदेचे माजी गटनेते खलील सय्यद, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहर काँग्रेसचे उमेश राजेनिंबाळकर विलास शाळू, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, अभिषेक बागल, अक्षय जोगदंड, जयसिंग पवार, मन्सुर सय्यद, सरफराज काझी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मागील अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी घसरण दिसून आली. याला इव्हीएम मशीनवरील मतदान हेच कारण आहे. त्यामुळे आता जनतेतही संभ्रम निर्माण झाला आहे. तांदुळवाडी येथे काही तरूणांनी इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली असल्याचे सांगून काँग्रेस पक्षाची विचारधारा ही लोकशाहीला पूरक आहे. पण जाती-पातीचे राजकारण करून सत्ताधारी पक्ष लोकशाहीला बाधक असे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले.
शेतकर्यांची कर्जमाफी, वीजबिल याबाबत केंद्र व राज्यातील सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. शेतकरी आणि सर्वसामान्य व्यावसायिक, जनतेच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विचारधारेला मानणार्या समविचारी पक्षांना सोबत घेवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.












