लोकमदत न्यूजचा दणका सत्ताधाऱ्यांना उशिरा का होईना जाग!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवकांचा पुढाकार; अजितदादांना सभागृहात पुन्हा श्रद्धांजली
‘आधी खाजगी कार्यक्रम, आता सर्वसाधारण सभा?’ – सत्ताधाऱ्यांना सभागृहात ठणकावले
धाराशिव | लोकमदत न्यूज
अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला. राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी श्रद्धांजली ठराव पारित केले. मात्र, धाराशिव नगर परिषदेच्या १३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा साधा ठरावही न मांडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर ‘लोकमदत न्यूज’ने २१ फेब्रुवारी रोजी सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आज अर्थसंकल्पासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत हा विषय पुन्हा ऐरणीवर आला.
सभेच्या सुरुवातीलाच सचिन पवार (उर्फ राजाभाऊ पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक, यांनी सर्वप्रथम अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची विनंती सभागृहाला केली. त्यांच्या प्रस्तावाला नगरसेवक नाना घाटगे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक राहुल काकडे आणि अभिजीत काकडे यांनी यापूर्वीच नगरपालिकेत अजितदादांना श्रद्धांजली वाहिल्याचा दावा केला. मात्र, त्याला तीव्र विरोध करत सचिन उर्फ राजाभाऊ पवार यांनी थेट सवाल केला – “ती श्रद्धांजली तुमचा खाजगी कार्यक्रम होता का? त्याची सभागृहाच्या इतिवृत्तात नोंद आहे का? प्रोसीडिंगमध्ये नोंद दाखवा!” असा ठणकावून सवाल त्यांनी केला.
“जर सर्वसाधारण सभेत अधिकृत नोंद नाही, तर नगरपालिकेने श्रद्धांजली वाहिली असे कसे म्हणता?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सभागृहात अधिकृत ठराव घेण्याची मागणी लावून धरली. अखेर सर्वानुमते अजितदादांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्याची अधिकृत नोंद घेण्यात आली.
पहिल्या सभेत विषयाचा ‘विसर’ पडलेले सत्ताधारी, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि लोकमदत न्यूज च्या दणक्यामुळेच हालचाल करत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या मंडळींना नैतिक जबाबदारीची आठवण विरोधकांनी करून द्यावी लागणे हीच खंत व्यक्त होत आहे.
धाराशिव नगर परिषदेत राजकीय कुरघोड्यांपेक्षा संवेदनशीलता आणि प्रोटोकॉलला प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला आणि विरोधकांनी सभागृहात आवाज उठवला, तेव्हाच सत्ताधाऱ्यांना जाग येते, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












