धाराशिवचा ‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव शहरातून बाहेर पडण्याचा मुख्य व महत्त्वाचा मार्ग असलेला सांजा रोड सध्या अक्षरशः खड्ड्यांनी विदीर्ण झाला असून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या अवघ्या दीड किलोमीटर अंतरासाठी वाहनधारकांना तब्बल अर्धा ते पाऊण तास वेळ लागत आहे. पाच मिनिटांचा प्रवास आता वाहतूक कोंडी, खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यात अडकून त्रासदायक ठरत आहे.
हा रस्ता शहराबाहेर जाण्याचा प्रमुख मार्ग असल्याने दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ असते. सांजा, सारोळा, सकणेवाडी, चिखली, राजुरी, बोरगाव, समुद्रवाणी, सांगवी, कामेगाव, पाडोळी (आ.) औसा, शिवली, वाघोली, काजळा, बोरगाव, मेंढा, घुगी, नितळी,कोंड आदी गावांतील नागरिक दररोज या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की लहान-मोठे अपघात नित्याचे झाले असून अनेकांना पाठदुखी, मणक्याचे विकार तसेच श्वसनाचे त्रास सुरू असल्याचे अनेक तक्रारी आढळून आले आहे. उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
सदर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामाची गती शून्य असल्याचा आरोप होत आहे. दर काही महिन्यांनी केवळ जेसीबी व पोकलेन आणून ‘काम सुरू आहे’ असा आभास निर्माण केला जातो; मात्र त्यानंतर पुन्हा शांतता पसरते. प्रशासनाकडून दर चार सहा महिन्यांनी रस्त्याची मोजणी होते, पण रस्त्यावरील खड्डे मात्र तसेच राहतात. संबंधित ठेकेदाराविरोधात कोणीही उघडपणे बोलत नसल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
विशेष म्हणजे शहराचे तसेच जिल्ह्याचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधीही याच मार्गाने दररोज प्रवास करतात. तरीदेखील ठेकेदार वा प्रशासनाला जाब विचारण्याचे धाडस कोणी दाखवले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी मौन बाळगून, प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून आणि ठेकेदार बेफिकीर राहिल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
अनेक वाहनधारकांचे मेंटेनन्स खर्च वाढले असून काहींना अपघातांतून कायमस्वरूपी दुखापतीही झाल्या आहेत. तरीदेखील नागरिक संघटित होत नसल्याने परिस्थितीत बदल दिसत नाही. “जनतेने एकत्र येऊन उग्र आंदोलन उभारल्याशिवाय या रस्त्याचे काम मार्गी लागणार नाही,” अशी भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, या रस्त्याचे काम नेमके कधी सुरू होणार व पूर्ण होणार याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परिणामी नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भर पडत असून सांजा रोड हा विकासाच्या आश्वासनांमधील मोठा प्रश्नचिन्ह ठरत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786















