काँक्रीटीकरणाची मुख्य मागणी – तात्पुरत्या उपाययोजनांना नागरिकांचा विरोध
धाराशिव, दि. 21 :
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक सांजा रोड मुख्य मार्गांवर दीर्घकाळापासून पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून अनेक अपघातही घडले आहेत. तरीदेखील प्रशासनाने केवळ तात्पुरते उपाय म्हणून खड्ड्यांमध्ये खडी टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र हा प्रकार स्थानिक नागरिकांनी हाणून पाडला.
आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक, सांजा रोड या भागात जेसीबी, पोकलेन व टिपरच्या साहाय्याने खड्ड्यात खडी टाकून बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी स्थानिक नागरिक मालोजी सूर्यवंशी व मनोज देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देत ठेकेदारास जाब विचारला. तात्पुरते खडीकरण करून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याने त्यांनी हे काम तत्काळ थांबविण्यास भाग पाडले.
यावेळी सूर्यवंशी व देशमुख यांनी काम करणाऱ्या ठेकेदाराला थेट सांगितले की, “या रस्त्यांचे कायमस्वरूपी काँक्रीटीकरणच झाले पाहिजे आणि पावसाचे पाणी योग्य मार्गाने वळवून सोडल्याशिवाय रस्ता टिकणार नाही. अन्यथा नागरिकांच्या समस्या वाढतच राहतील.” त्यांच्या भूमिकेमुळे ठेकेदाराने देखील या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये काँक्रीट करून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकदरम्यान एका व्यक्तीचा बळी गेला तर अनेक नागरिक किरकोळ अपघातांत जखमी झाले होते. इतकी गंभीर परिस्थिती असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. यापूर्वी नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन करूनही ठोस उपाययोजना झाल्या नव्हत्या.
आज मात्र जागरूक नागरिकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे प्रशासन व ठेकेदारांना जाग आली. मालोजी सूर्यवंशी व मनोज देशमुख यांच्या धाडसी भूमिकेचे शहरभर कौतुक होत आहे. “जर प्रत्येक भागातील नागरिक अशाच पद्धतीने पुढाकार घेतला तर शहरातील रस्ते कायमस्वरूपी सोडवले जातील, ठेकेदार व प्रशासनाचे पितळ उघडे पडेल,” असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
दरम्यान, पाटस-दौंड-धाराशिव-बोरफळ हा रस्ता अनेक वर्षांपूर्वी मंजूर असूनही अद्याप काम सुरू झालेले नाही. ठेकेदाराची हलगर्जीपणा की राजकीय दबाव यामुळे हे काम रखडले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी हे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.













