लो.अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी अखेर जागा मिळाली ४० वर्षांची प्रतीक्षा संपली
शासकीय दुग्ध डेअरीची १ एकर जागा नगरपरिषदेला विनामूल्य हस्तांतरित सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री, महसूलमंत्री व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव
धाराशिव | लोकमदत न्यूज
मातंग समाजाच्या तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. धाराशिव शहरातील शासकीय दुग्ध डेअरीची सुमारे १ एकर जागा नगरपरिषद धाराशिवकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यात आली असून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.
या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकताच घेतला असून १६ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे जागेची अधिकृत ताबा पावती सुपूर्द करण्यात आली.
या जागेची शासकीय किंमत सुमारे २ कोटी ०८ लाख रुपये इतकी असून, नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही रक्कम शासनाला भरणे शक्य नव्हते. यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत ही जागा पूर्णतः विनामूल्य मिळवून दिली.
या निर्णयामुळे धाराशिव शहरातील “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक” येथे भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मातंग समाजाच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, नगरपरिषद धाराशिवच्या सर्वसाधारण सभेत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
जागेचा ताबा नगरपरिषदेकडे मिळाल्यानंतर मातंग समाजाच्या वतीने पुतळा उभारण्यात येणाऱ्या ठिकाणी जल्लोष करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. नेहा राहुल काकडे, मुख्याधिकारी सौ. नीता अंधारे, बांधकाम सभापती अभिजित काकडे, पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, बापू पवार, नगरसेवक राहुल काकडे,वंदना पवार, दत्ता पेठे, किसन पेठे, खंडू चांदणे, सुमित क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी व मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निर्णयामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले गेल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












