प्रशासनाचा दावा एकीकडे, प्रत्यक्ष परिस्थिती दुसरीच – नेमकं संभ्रम निर्माण करतंय कोण?
गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा फोल १५ दिवसांनी घरपोच सेवा, रांगा कायम, बीएसएनएलवर मेसेज बंद
धाराशिव | लोकमदत न्यूज
जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून सातत्याने केला जात असला, तरी प्रत्यक्षात ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांमुळे या दाव्याची हवा निघाली आहे. गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, घरपोच सेवा उशिरा मिळत आहे. त्यामुळे प्रशासन आणि वास्तव यामध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, नेमकं संभ्रम निर्माण करतंय कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा प्रशासनाने १२ मार्चपासून गॅस पुरवठा सुरळीत होत असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात वितरण व्यवस्थेचे केंद्रीकरण झाल्याने व्यवस्था विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी विविध ठिकाणी असलेली वितरण केंद्रे बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन सिलेंडर घ्यावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे.
दरम्यान, शहरातील विविध गॅस एजन्सीसमोर सकाळी ६ वाजल्यापासूनच रांगा लागत असून, अनेक ठिकाणी नागरिकांना ४ ते ५ तास उन्हात उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी ही प्रतीक्षा दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून येते. एवढ्या त्रासानंतरही गॅस वेळेवर मिळेल याची शाश्वती नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था सुरू असली, तरी तीही पूर्णपणे प्रभावी नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अधिकृत नंबरवर संपर्क साधल्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही, तर काही वेळा बुकिंग प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. विशेष म्हणजे, बीएसएनएल मोबाईल क्रमांकावर गॅस बुकिंगचा मेसेज येणे बंद झाल्याने ग्राहकांची अडचण अधिकच वाढली आहे. इतर सर्व शासकीय सेवा आणि ओटीपी बीएसएनएलवर येत असताना केवळ गॅस बुकिंगचा मेसेज येत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, घरपोच गॅस सेवा देखील उशिराने मिळत आहे. पूर्वी बुकिंगनंतर दुसऱ्या दिवशी मिळणारा सिलेंडर आता तब्बल १५ दिवसांनी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर गॅस टंचाईचे संकट ओढवले आहे.
गॅस पुरवठा पूर्ववत असल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्षात सिलेंडर कुठे वितरित होत आहेत? पुरवठ्यात कपात झाली आहे का? याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता नसल्याने संशय अधिकच बळावत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेऊन गॅस कंपन्यांकडून वस्तुस्थिती स्पष्ट करून घ्यावी, वितरण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करावे आणि बीएसएनएलवरील मेसेज सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












