धाराशिव नगर परिषद पाण्यासाठी जनता त्रस्त… निर्जन भागात मात्र लाखोंच्या पाईपलाईन! यामागील मुख्य ‘आका’ कोण?
अधिकाऱ्यांनाही माहिती नाही; लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून कारभार सुरू?
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिक अक्षरशः पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मात्र या गंभीर परिस्थितीतही नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचा अजब आणि संतापजनक कारभार समोर आला आहे.
शहरातील मुख्य वस्ती असलेल्या भागांमध्ये नळ कनेक्शनसाठी नागरिकांना नगर परिषदेत वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. “येथे पाईपलाईन नाही”, “नवीन लाईन टाकावी लागेल” अशा कारणांवर अर्ज रखडवले जात आहेत. अनेक भागांमध्ये पाईपलाईन असूनही कनेक्शन देण्यात टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. परिणामी सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधेसाठीही अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
याउलट, शहराच्या बाहेरील जाधववाडी रोड परिसरात, जिथे एकही घर नाही, अशा निर्जन ठिकाणी ५०० मीटर ते १ किलोमीटर आतपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम जोमाने सुरू असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी केवळ प्लॉटिंग व वीटभट्टी असल्याचे वास्तव असून, प्रत्यक्षात पाण्याची कोणतीही तातडीची गरज नाही. तरीही नगर परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणात खर्च करून पाईपलाईन टाकली जात असल्याने या कामामागे मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “सदर कामाबाबत मला कोणतीही माहिती नाही” असे सांगितले. संबंधित कामाची माहिती घेऊन कळवतो असेही त्यांनी नमूद केले. यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवून हे काम सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
नगर परिषदेमध्ये नुकतेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि काही अधिकारी नवीन असल्याने त्यांना शहराच्या भौगोलिक व प्रशासकीय बाबींची पूर्ण माहिती नसल्याचा फायदा घेतला जात असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे यांच्यासह नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनाही या प्रकाराबाबत सखोल माहिती नसल्याचे बोलले जात आहे.
शहरात जिथे प्रत्यक्षात पाण्याची गरज आहे त्या भागांकडे दुर्लक्ष करून निर्जन ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचा प्रकार हा केवळ प्रशासनातील त्रुटी नसून नियोजनबद्ध गैरव्यवहार असल्याचा आरोप होत आहे. या सर्व कामांमागे नेमका “आका” कोण आहे? कोणत्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना हाताशी धरून ही कामे केली जात आहेत? शहरातील आणखी किती ठिकाणी अशाच पद्धतीने बोगस कामे करण्यात आली आहेत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
ज्या ठिकाणी अनावश्यकपणे पाईपलाईन टाकण्यात आली आहे ती तात्काळ काढून घ्यावी आणि ज्या भागात प्रत्यक्ष गरज आहे त्या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, पाणीपुरवठा सभापती व पाणीपुरवठा अभियंता यांनी तात्काळ या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य बाहेर आणणे आणि मुख्य सूत्रधाराला उघडे पाडणे गरजेचे बनले आहे. अन्यथा, धाराशिवकरांचा पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
















