धाराशिव, दि.२३(प्रतिनिधी):उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाची ताकद ग्रामीण भागात अधिक वाढविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांजा ग्रामपंचायतचे माजी सदस्य, सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते तसेच आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गफूर भाई शेख यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धाराशिव तालुका उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, खासदार ओमराजे निंबाळकर, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धाराशिव जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली. नियुक्तीपत्र देताना पक्षाचा वरिष्ठ नेत्यांनी शेख यांच्या कामाची दखल घेत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गफूर भाई शेख हे शिवसेनेच्या विविध आंदोलनांमध्ये व पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून, स्थानिक पातळीवर जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढा देत आले आहेत. संघटनेबद्दल त्यांची निष्ठा, पक्षनिष्ठ कार्यपद्धती व सामाजिक भान लक्षात घेता त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे पक्षाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेना तालुका उपप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गफूर भाई शेख यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व पक्षाच्या ध्येय-धोरणांचा प्रसार करण्यासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल सतीश सोमाणी तालुकाप्रमुख, सोमनाथ गुरव शहरप्रमुख तथा माजी गटनेता नगर परिषद धाराशिव, दिनेश बंडगर जिल्हा संघटक यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












