मुख्यमंत्री रोजगार’मध्ये सलग चौथ्या वर्षी धाराशिव राज्यात अव्वल जिल्ह्याची ऐतिहासिक गगनभरारी ; उद्दिष्टाच्या प्रमाणात १२९ टक्के कामगिरी
चार वर्षात ३१०० प्रकल्पांना मंजुरी : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव लोकमदत न्यूज
‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ (CMEGP) कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याने केवळ उद्दिष्ट पूर्ण केले नाही, तर सलग चौथ्या वर्षी १०० टक्क्यांहून अधिक कामगिरी करणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा होण्याचा मान पटकावला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयामुळे धाराशिवने हे ‘यशशिखर’ गाठले आहे.
चालू आर्थिक वर्षात धाराशिव जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल १००७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्याने १२९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकिंग क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जिल्ह्यातील नवउद्योजकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या यशात जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, तेरणा जनसेवा केंद्राची टीम, प्रा. किरण आवटे आणि प्रमोद सुतार यांनी सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी तेरणा जनसेवा केंद्राच्या माध्यमातून मागील चार वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शासनाकडून मिळालेल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक काम करून तेरणा जनसेवा केंद्राने जिल्ह्यात उद्योजकतेची नवी लाट निर्माण केली आहे. आगीत चार वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास या कार्याचा वेग लक्षात येतो. विशेष म्हणजे, २०२५-२६ या वर्षात ८०० चे लक्ष्य निर्धारित असतानाही तब्बल १००७ प्रकरणे मंजूर करून घेण्यात केंद्राला यश आले आहे. हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी केंद्राने जमिनीवर उतरून काम केले. जिल्ह्यात ७५० पेक्षा जास्त चर्चासत्रे, उद्योग शिबिरे आणि महिला बचत गटांचे मेळावे घेऊन सरकारी योजनांची माहिती पोहचवली. केवळ माहिती देऊन केंद्र थांबले नाही, तर ऑनलाइन अर्ज भरून देणे, बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करणे, उद्योगासाठी मिळणारी सबसिडी (अनुदान) मिळेपर्यंत पूर्ण मदत करणे. थोडक्यात सांगायचे तर ज्यांना स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा सामान्य नागरिकांसाठी ‘तेरणा जनसेवा केंद्र’ एक भक्कम आधारवड ठरले आहे. या प्रयत्नांमुळेच चार वर्षात ३,१०० उद्योजक स्वतःच्या कुटुंबाची गुजरान या उद्योगावर करीत आहेत. जिल्ह्याने सलग चार वर्षे ही सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक नकाशावर धाराशिवचे नाव आता ठळकपणे उमटले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी तेरणा जनसेवा केंद्राच्या समन्वयाने ही अभूतपूर्व कामगिरी केली आहे. लीड बँक ऑफिसर श्री. पांडा व जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अर्थात उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम यांनीही याकामी मोठे योगदान दिले आहे. कौशल्य व रोजगार मार्गदर्शन केंद्र, खादी ग्रामोद्योग विभाग, MCED आणि MITCON यांचेही या ऐतिहासिक गगनभरारीमध्ये मोठे योगदान राहिले आहे. जिल्हा उद्योग केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी बांधवांनी जिल्ह्यातील नव उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शक केल्यामुळे सलग चार वर्ष धाराशिव जिल्हा राज्याच्या नकाशावर आपली ठळक कामगिरी सिद्ध करीत आला आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात हजारो हातांना काम मिळाले आहेच, त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही पुढील काळात मोठी गती प्राप्त होणार आहे.
औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी कटिबद्ध : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्याचे हे यश देदीप्यमान आहे. प्रशासनातील सर्व विभाग आणि बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच आपण नवउद्योजकांना बळ देऊ शकलो. भविष्यातही जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.












