धाराशिव बसस्थानकात ज्येष्ठ व दिव्यांगांची लूट? ‘199’ चा फलक, वसुली मात्र 250 च्या…. एजन्सी दलालांचा मनमानी कारभार कॅमेरात कैद!
पासेसच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; पत्रकारांनाही दमदाटी, विभागीय नियंत्रक कारवाई करणार की पाठीशी घालणार?
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सवलतीचे पास देण्याच्या योजनेत गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाने बोगस पासेस रोखण्यासाठी नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू केली असून, त्याअंतर्गत एसटी महामंडळाच्या वतीने ‘एक खिडकी योजना’ राबवण्यात येत आहे. मात्र या योजनेच्या नावाखालीच ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप प्रवासी वर्गातून होत आहे.
बस स्थानकातील संबंधित काऊंटरवर दर्शनी फलकावर 199 रुपये शुल्क नमूद असताना प्रत्यक्षात 230 ते 250 रुपये वसूल केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातून सकाळी लवकर येणारे ज्येष्ठ नागरिक तासन्तास रांगेत उभे राहून पास काढण्याची वाट पाहत असताना, या ठिकाणी एजन्सीचा मनमानी कारभार सुरू असल्याने त्यांना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
विशेष : कॅमेरात कैद लूटप्रकरण
मात्र या ठिकाणी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकडून होत असलेली आर्थिक लूट ही लोकमदत न्यूजच्या कॅमेरात कैद झाली असून, ही लूट थांबवण्यासाठी संबंधित काऊंटर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखालीच सुरू करण्यात यावे, अशी मागणी दिव्यांग व्यक्तींनी केली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
याहून गंभीर बाब म्हणजे संबंधित काऊंटर वेळेवर सुरू होत नाही, तसेच कोणतीही निश्चित वेळ न पाळता केव्हाही सुरू व बंद केला जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करताना संबंधित ठेकेदाराने आपल्या बगलबच्च्यांना फोन करून पत्रकारांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर “जे करायचे ते करा, आम्हाला काही फरक पडत नाही” अशी उर्मट भाषा एजन्सीच्या दलालांकडून पत्रकारांना वापरली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बस स्थानक प्रमुखांच्या कार्यालयाशेजारीच हा प्रकार सुरू असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांची उघडपणे लूट होत असताना संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे प्रवासी वर्गात तीव्र संताप पसरला असून, संबंधित एजन्सी व दलालांवर तात्काळ कारवाई करावी आणि एजन्सीकडील काम काढून इतर एजन्सीकडे तत्काळ देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. विभागीय नियंत्रक याबाबत कठोर भूमिका घेणार की या मनमानी कारभाराला पाठीशी घालणार, असा संतप्त सवाल ज्येष्ठ व दिव्यांग प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
















