धाराशिव, दि. २३ (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने काल (दि. २२ ऑगस्ट) उशिरा रात्री अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करत तब्बल १५ लाख ७६ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साधारण १२.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरून पाटोदा-धाराशिव मार्गे बीडकडे जाणारी टॉयोटा इनोव्हा (क्र. एम.एच. ०३ ए.एस. ७५७२) संशयावरून तपासली असता, गाडीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला.
या कारवाईत इरफोज रशिद सय्यद (वय २४, रा. गांधी नगर, बीड) व उमेर अल्ताउद्दिन पठाण (वय २६, रा. मोमीनपुरा, बीड) यांना ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. दोन्ही आरोपींवर भा. दं. सं. २६९/२०२५ कलम १८८, २७२, २७३, २७५(अ) व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक टी.आर. भालगाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे, स.पो.फो. मुंडे, पो.हे.को. दयाराम कोळी, पो.ना. विलास जमदार, पो.ना. सागर कांबळे, पो.कॉ. परमेन्द्र कदम आणि पो.कॉ. सुर्यकांत कदम यांनी सहभाग घेतला.












