धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) – धाराशिवहून बेंबळी मार्गे लातूरला जाणार्या प्रवाशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. दिशादर्शक फलक, गतिरोधकाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. महामार्गावरील ब्लाईंड स्पॉट दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी परिवहन आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणांची संयुक्त पाहणी केली आहे.
धाराशिवहून लातूरला जाण्यासाठी एकूण तीन मार्ग आहेत. त्यातील ढोकी मार्गे असलेला रस्ता प्रचंड खराब असल्यामुळे प्रवाशी तुळजापूर अथवा बेंबळी मार्गे लातूरला जाण्यास प्राधान्य देतात. बेंबळी – उजनी – औसा मार्गे असलेला रस्ता प्रशस्त राज्य महामार्ग असल्यामुळे अलीकडच्या काळात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. असे असताना या महामार्गावरील काही ब्लाईंड स्पॉटमुळे अपघात ओढावू शकतात. त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची बाब लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर परिवहन विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी महामार्गाची संयुक्त पाहणी केली आहे. ज्या ठिकाणी तीव्र वळण आहे, त्या ठिकाणी क्रॅश बेरिअर सुविधा असणे आवश्यक आहे.
दिशादर्शक फलक, सूचना फलक आणि अन्य माहिती देणारे फलकही महामार्गावर लावण्याबाबत निर्णय झाला आहे. वेग मर्यादा, अरूंद पुल चिन्ह, प्रत्येक चौक आणि धोकादायक ठिकाणी गतिरोधक आणि रंबरल स्ट्रिप, काम सुरू असणार्या ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना आणि रात्री प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुविधेसाठी कॅटाईज प्रणाली राबविण्याबाबत या पाहणी दरम्यान ठरविण्यात आले असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान, सचिन बंग आणि बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.












