उमरगा, ता. २६ (प्रतिनिधी):उमरगा तालुक्यातील अलूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी सीमा शिवगुंडे यांच्या निष्काळजी कारभारामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले असून नुकत्याच घडलेल्या एका घटनेत कुत्रा चावलेल्या एका मुलाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. याबाबत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार उमरगा यांचेकडे लेखी निवेदन देत डॉक्टरांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की लक्ष्मीकांत यादव गुरवे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे की त्यांच मुलगा लोकेश गुरवे याला कुत्रा चावल्याने ते तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, अलोर येथे गेले. मात्र तेथे पोहोचल्यावर ड्युटीवरील डॉक्टर सीमा शिवगुंडे उपस्थित नव्हत्या. डॉक्टरांना फोन करून विचारणा केली असता “पाच मिनिटांत येते” असे उत्तर देण्यात आले. दरम्यान नर्स केंद्रात आली, पण डॉक्टर मात्र बराच वेळ लोटूनही आल्या नाहीत.
डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत परत फोन करून विचारले असता डॉक्टरांचे पती शिवशंकर शिवगुंडे यांनीच फोन उचलला. त्यांनी “मॅडम येणार नाहीत, नर्स आहे तिला सांगा, ती इंजेक्शन देईल” असे सांगत अरेरावीची व अश्लील भाषेतील वागणूक दिल्याचा आरोप अर्जदाराने दिलेल्या निवेदनामध्ये केला आहे.
अर्जदारासह ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार, संबंधित डॉक्टर वेळेवर केंद्रावर हजर राहत नाहीत, रुग्णांना खासगी दवाखान्यात येण्यासाठी भाग पाडतात, अगदी सरकारी हॉस्पिटलमधील सलाईन आणि औषधे स्वतःच्या दवाखान्यात नेऊन रुग्णांकडून अवैधरित्या पैसे उकळतात. यामुळे सामान्य रुग्णांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे,
यापूर्वीही अशाच निष्काळजीपणामुळे सुरज गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. करंट लागल्याने गंभीर जखमी झालेल्या गायकवाड याला उपचार मिळवण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले होते, मात्र त्या ठिकाणी पोहोचण्यास ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार उमरगा यांचेकडे लेखी निवेदन देऊन निष्काळजी डॉक्टर सीमा शिवगुंडे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर लक्ष्मीकांत गुरवे यांच्यासह ब्रह्मानंद उमष्टटे,अनिल मर्बे ,शशिकांत पारडे, विलास हावळे, यशवंत गुरवे, सूर्यकांत भंडारे, पद्माकर भांडेकर, शाम कांबळे, रवी राठोड,रवि चव्हाण, अनिल मर्वे, शिरीष पाटील, संतोष भालके, धोंडीराम राठोड, महादेव समान, खंडेश,काळू,नागेश का. शेट्टी आदींसह असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.












