धाराशिव, दि. ३१(प्रतिनिधी): शहरातील मुख्य बाजारपेठेतल्या निंबाळकर गल्लीतील गणेश निंबाळकर यांच्या घरावर (फ्लॅट) पोलिसांनी शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निंबाळकर यांच्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकून सुरू असलेला जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत आठ जणांना अटक करण्यात आली असून काहीजण दुसऱ्यांच्या इमारतीवरून उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, तर पकडलेल्या कडून त्यांच्या जवळून एकूण १,०५,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित कॉलनीत, मुख्य बाजारपेठ असलेल्या भर वस्तीत फ्लॅट मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध क्लब सुरू असूनही फक्त एवढीच रक्कम हाती लागल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विश्वसनी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार निंबाळकर गल्ली येथे गणेश निंबाळकर यांच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर मोठ्या रकमेची देवाणघेवाण सुरू होती, मात्र कारवाईदरम्यान एवढीच रक्कम पोलिसांना मिळाल्याने “यामध्ये काही गोडबंगाल झाला का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, क्लबच्या प्रवेशद्वाराला कायम कुलूप लावून ठेवले जात असे. फक्त पत्ते खेळण्यासाठी ओळखीचे लोक आल्यावरच आत सोडून पुन्हा कुलूप लावले जाई. यामुळे क्लब गुप्त राहून बराच काळ पोलिसांच्या नजरेआड होता. छाप्यावेळी काही आरोपी शेजारच्या इमारतीवरून उड्या मारून पसार होण्यात यशस्वी झाले, तर आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडले.
धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे ४१६/२०२५ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ नुसार नोंदविण्यात आला असून ही कारवाई धाराशिव शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. कुंभार यांनी केली. पुढील तपास पोह. पवार यांच्याकडे आहे. सदरील कारवाई केलेली फिर्याद पोहेकॉ अनंत जयवंत आडगळे यांनी दाखल केली आहे. तर जुगार खेळत असलेल्या सर्फराज कुरेशी, सुनिल कुंभार, बालाजी अलकुंटे, संदिप शिंदे, दत्ता मुंडे, नरहरी चव्हाण, अरविंद गोरे आणि आशोक वाघमारे (सर्व रा. धाराशिव) यांना पोलिसांनी रंगेहात पकडले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. क्लब वर केलेल्या कारवाई दरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, पत्ते, मोबाईल फोन तसेच मोटरसायकल (दुचाक्या) असा एकूण ₹१,०५,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
दरम्यान, हा अवैध क्लब धाराशिव शहरात ओळखले जाणारे प्रतिष्ठित नागरिकांच्या शेजारी (भागांमध्ये) सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच धाराशिव शहरात सोलापूर रोड, बांगड ऑइल मिल परिसर, धारासुर देवी मंदिर मागील परिसर, वरोडा रोड उड्डाणपुल पलीकडील परिसर तसेच संत गोरोबा काका नगर परिसर (टापरे बिल्डिंग मागील भाग) अशा अनेक ठिकाणी पत्त्यांचे अवैध क्लब गुप्तपणे सुरू असल्याची चर्चा असून, आता तरी जिल्ह्यातील “लेडी सिंघम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभारी पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांनी कायमस्वरूपी पथक उभे करून अशा अड्ड्यांवर धडक कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद 8390088786











