वाशी दि.३१ (प्रतिनिधी):राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास आता मुस्लिम समाजाचा देखील वाढता पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधवांनी “मराठा आरक्षणाच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही तन-मन-धनाने सोबत आहोत” असा निर्धार व्यक्त केला आहे.
मुंबईत मराठा समाजाचे उपोषण, ठिय्या आंदोलन सुरू असताना मुस्लिम समाजाने आपली ऐक्यभावना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली आहे. आंदोलनस्थळी जाणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मदरसे व मस्जिदे निवासासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर वाशी येथून मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बॉक्स मुंबईला पाठविण्यात आले असून, आगामी काळातही मुबलक पाणीपुरवठा व अन्य मदतकार्य सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
समाजाच्या वतीने आवाहन करताना असे सांगण्यात आले की,
“तुम्ही जाताना मराठे म्हणून जा आणि येताना कुणबी मराठा म्हणून परत या. हा लढा न्यायाचा असून आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत उभे आहोत.”
मराठा आरक्षणासाठी राज्यभरातून मिळत असलेल्या अभूतपूर्व समर्थनात मुस्लिम समाजाचा सहभाग हा सामाजिक एकात्मतेचा आणि बंधुभावाचा उत्तम आदर्श ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.












