वाशी (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जंरगे पाटील यांच्या आंदोलनामुळे शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून जीआर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला १००% कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याची व्हॅलिडिटी देखील कायम राहणार आहे. हा निर्णय न्यायालयातही टिकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
यापूर्वी काढण्यात आलेल्या सगे-सोयऱ्यांच्या जीआरचा कोणालाही उपयोग झाला नव्हता. मात्र या वेळी घेतलेला निर्णय हा समाजासाठी ऐतिहासिक ठरत आहे. हा खरा आनंद साजरा करण्याचा क्षण आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्व मराठा बांधवांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजात सर्वत्र भावना व्यक्त होत आहे की – “जंरगे पाटील यांचं योगदान मराठा समाज कधीही विसरणार नाही.”
या पार्श्वभूमीवर वाशी गावात मराठा समाजाच्या वतीने जल्लोष यात्रा व विजय यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सर्व मराठा स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच गावातील इतर जाती-धर्मातील नागरिकांबरोबरच मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामुळे सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.
शेवटी गावकऱ्यांच्या वतीने प्रशांत बाबा चेडे यांनी सर्व मराठा स्वयंसेवक, मुस्लिम समाज तसेच इतर जाती-धर्मातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.












